नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर सरन्यायाधीश कोण होणार? असा प्रश्न नक्कीच पडणार, परंतु खुद्द सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मराठी असलेले वरिष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद (एस. ए.) बोबडे यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात यावे, अशी शिफारस विधी आणि न्याय मंत्रालयाकडे केली आहे. याबाबतचे पत्र सरन्यायाधीशांनी लिहले आहे.
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. आता ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ असलेल्या न्यायाधीश बोबडे यांची शिफारस त्यांनी सरन्यायाधीश पदासाठी केली आहे.
बोबडे यांची कारकीर्द
न्या. शरद अरविंद बोबडे यांचा जन्म नागपूरमध्ये २४ एप्रिल १९५६ रोजी झाला. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरु केली. १९७८ मध्ये ते महाराष्ट्र बार काऊन्सिलचे सदस्य बनले. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी काम सुरु केले. मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची सन २००० मध्ये नियुक्त झाली. मधल्या काळात मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश त्यानंतर २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टात ते न्यायाधीश झाले. न्या. एस. ए. बोबडे हे २३ एप्रिल २०२१ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदी कार्यरत असलेले दुसरे सरन्यायाधीश असतील. यापूर्वी न्या. कपाडिया हे सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर कार्यरत होते.