काल बुधवारी फेसबुकच्या शेअर्सच्या भाव मोठ्या फरकाने कोसळले. कंपनीचा मालक मार्क झकरबर्ग याच्या संपत्तीत त्यामुळे घट झाली. अवघ्या दोन तासांमध्ये फेसबुकच्या शेअरचा भाव 20 टक्क्यांनी कोसळला आणि मार्क झकरबर्गची श्रीमंती तब्बल 16.8 अब्ज डॉलर्सनी कमी झाली. आता मार्क झकरबर्गच्या ताब्यात असलेल्या शेअर्सचे बाजारमूल्य सुमारे 70 अब्ज डॉलर्स आहे जे बुधवारी सकाळी 84 अब्ज डॉलर्सच्या आसपास होते.
कमी झालेली रक्कम मार्क झकरबर्गसाठी संपत्तीच्या एक पंचमांश आहे. गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर टिका होत आहे. परंतु आत्तापर्यंत याचा परिणाम फेसबुकच्या उत्पन्नावर झाला नव्हता. बुधवारी मात्र फेसबुकने दुसऱ्या तिमाहीचे निकाल सांगितले. अपेक्षेएवढी वाढ फेसबुकला साधता आलेली नाही हे जसे स्पष्ट झाले त्याचप्रमाणे येत्या सहा महिन्यांमधली उत्पन्नाची वाढही अपेक्षेएवढ्या गतीने वाढणार नसल्याचे समोर आले.