कृऊबा सभापतींची मांडवली ‘फेल’ ; व्यापार्‍यांचा विश्‍वास तोडला

0

पाच दिवस उलटूनही विकासने भिंत बांधली नाही ; व्यापार्‍यांचा पुन्हा आजपासून बेमुदत संप

जळगाव- कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षण भिंत पाडल्यानंतर कृऊबा सभापती कैलास चौधरी यांनी विकासक तसेच व्यापार्‍यांमध्ये चर्चा घडवून आणून नवीन भिंत बांधून देण्यात मांडवली केली होती. यावेळी विकासकाने पाच दिवसात जशी होती तशी नवीन भिंत बांधण्याचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र पाच दिवस उलटनूही विकासकाने कुठलीही भिंत बांधण्याचे काम सुुरु केले नाही. सभापतींनी विकासकाच्या बाजूने व्यापार्‍यांना आश्‍वासन दिल्यानंतर अखेर व्यापार्‍यांनी बेमुदत बंद मागे घेतला होता. मात्र सभापतींची मांडवली फेल ठरली असून सभापतींच्या म्हणण्याप्रमाणे विकासकाने कुठलाही शब्द न पाळल्याने व्यापार्‍यांच्या विश्‍वासाला तडा गेला आहे. होती तशीच वृक्ष, पाण्याची टाकी तसेच सुविधांसह नवीन भिंत बांधून देण्यावर व्यापारी ठाम असून सोमवापासून व्यापारी बेमुदत बंद आंदोलनास बसणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची भाजीपाला मार्केट ते धान्य मार्केट पर्यंतची सुमारे 300 मीटर लांबीची कुंपण भिंत 7 रोजी, शनिवार शासकीय कार्यालयांना सुटी असतांना पाडण्यात आली होती. भिंत पाडण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची बैठक किंवा व्यापार्‍यांशी चर्चा न करताच हा निर्णय झाला. विकासकच्या फायद्यासाठी भिंत पाडण्यात आल्यासह तसेच भिंत पाडण्याआधी सहकार विभागाची देखिल परवानगी घेण्यात आलेली नाही. बाजार समितीची मालमत्ता अशा पध्दतीने तोडण्याआधी संचालक मंडळाच्या बैठकीत विषय का घेण्यात आला नाही? असे प्रश्‍न उपस्थित करुन व्यापार्‍यांनी वेगवेगळे आरोप केले होते. होती तशीच भिंत पुन्हा बांधून देण्यात यावी, या मागणीसाठी बेमुदत आंदोलन पुकारले होेते.

सुरेशदादा जैन यांची मध्यस्थी ठरली अपयशी ?
भिंत पाडण्यार्‍या विकासकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी भिंत बांधण्याबाबत सभापती कैलास चौधरी यांनी विकासक व व्यापारी यांच्यात मांडवली केली आहे. व्यापार्‍यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचीही भेट घेतली होती. सुरेशदादांनीही सभापतींशी चर्चा करुन कायदेशीररित्या जे योग्य आहे त्यानुसार न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्याने न्यायालयाचा निकाल येईपर्यंत पुन्हा भिंत बांधून देण्यावर मत व्यक्त केले होते. यानंतर सभापतींच्या मांडवलीनंतर विकासकाने नवीन भिंत बांधून देण्याचे तोंडी आश्‍वासन दिल्यावर व्यापार्‍यांनी बेमुदत बंदचे आंदोलन मागे घेतले. आता पुन्हा सभापतींसह विकासकाने आश्‍वासन न पाळल्याने व्यापार्‍यांवर पुन्हा बेमुदत बंद आंदोलनाची वेळ आली आहे. असून सभापती नव्हे तर सुरेशदादा जैन यांचीही मध्यस्थी भिंत बांधून देण्यात यानिमित्ताने अपयशी ठरली आहे.

सभापती म्हणतात पत्र्यांचे कुंपण , संकुल होणारच
सभापतीने कृऊबा प्रशासनाने शेतकरी हित लक्षात घेवून निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र कैलास चौधरी हे विकासकाच्या बाजूने बोलत असल्याचे चित्र आहे. आश्‍वासननंतर भिंत न बांंधून दिल्याप्रकरणी जनशक्तिने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, चौधरी म्हणाले की, व्यापारी संकुल होईल, संकुल होईपर्यंंत व्यापार्‍यांना पत्र्यांचे कुंपन करुन देण्यात येईल. सभापतींच्या या युटर्न ने व्यापार्‍यांसह सर्वांनीच आश्‍चर्य व्यक्त केले असून सभापती कृऊबासोबत की विकासकासोबत आहेत? असा प्रश्‍न उपस्थित होवून संशय निर्माण होत आहे.

हमाल, मापाड्यांवर उपासमारीची वेळ
दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकर्‍याने आहे तो माल कृऊबा आणून विक्री करुन मिळेल त्या पैशांमध्ये घर चालवित आहे, तर दुसरीकडे आज काम करेन तर उद्या खाईन अशी परिस्थिती हमालांची आहे. भिंत पाडल्याच्या विकासक, सभापती आणि व्यापार्‍यांच्या भांडणामुळे शेतकर्‍यांसह, हमाल, मापाड्यासह कष्टकर्‍यांची रोजीरोटी हिसकावली आहे. आधीच उन्हाळा असल्याने दुसरी कामे नाहीत, त्यातच पुन्हा सोमवार पासून बेमुदत बंदमुळे हमाल, मापाड्यांचे हातचे काम जावून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.