बाजार समिती निवडणूक : पारोळ्यात शिंदे गटाचे आ. चिमणराव पाटील तर भुसावळात महाविआच्या खडसेंना धक्का

जामनेर, भुसावळ, चाळीसगावात भाजप, पारोळा, रावेर महाविआ,चोपड्यात त्रिशंकू

जळगाव, धरणगाव,पाचोरा, अमळनेर, बोदवड, यावल बाजार समित्यांचा आज निकाल

जळगाव। जिल्ह्यातील बारा बाजार समित्यापैकी सहा बाजार समित्यांपैकी सहा बाजार समित्यांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. काही निकाल धक्कादायक तर काही अपेक्षित असेच निकाल लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारोळा बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मार्केट कमिटी बचाव पॅनल ने 18 पैकी पंधरा जागांवर विजय नोंदवत एक हाती सत्ता मिळवली आहे. शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना पराभवाची धूळ चारत मोठा धक्का दिला आहे. आमदार पाटील यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात दाखल झाल्यामुळे ते आणि पारोळा बाजार समितीची निवडणूक चर्चेत होती. भूसावळ बाजार समितीत एकेकाळचे खंदे समर्थक आमदार संजय सावकारे यांनी आपले नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. भूसावळमधील महाविकास आघाडीचा पराभव हा खडसेंना धक्का मानला जात आहे. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन,चाळीसगावमध्ये खा. उन्मेश पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपाने विजय मिळवला आहे. रावेरमध्ये काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. चोपड्यात भाजपाला सर्वाधिक जागा भाजपाला मिळाल्या असल्या तरी तेथे त्रिशुंक स्थिती आहे. उर्वरीत जळगाव, धरणगाव,पाचोरा, अमळनेर, बोदवड, यावल या सहा बाजार समित्यांचे निकाल उद्या रविवारी लागणार आहेत.

 

पारोळ्यात शिंदे गटाचे खोके साफ

पारोळा बाजार समितीत महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या जयकिसान पॅनलला केवळ तीन जागांवरच विजय मिळवता आला आहे. बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीच्या मार्केट कमिटी बचाव पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे. बाजार समितीत विजयाचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

 

भुसावळात खडसे, संतोष चौधरींना धक्का

भुसावळ बाजार समितीवर भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवत भुसावळ बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. भुसावळ तालुक्यातील जनता ही आमच्या पाठीशी असल्याचे सिध्द झाले आहे. बाजार समितीची निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम समजली जाते. त्यामूळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपालाच यश मिळेल अशी प्रतिक्रिया विजयानंतर भाजप आमदार संजय सावकारे यांनी दिली आहे. गेल्या काळात भुसावळ बाजार समिती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. माजी आमदार संतोष चौधरी यांचे या बाजार समितीवर वर्चस्व होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत बाजार समितीवर भाजप शिंदे गटाने त्यांचा झेंडा फडकवला आहे.

रावेरला महाविकास आघाडी 13 जागा 

रावेर। येथील कृषी उपन्न बाजार समितीत महाविकास आघाडीने 18 पैकी 13 जागांवर विजयी मिळवत शेतकरी विकास पॅनलने बाजार समिती काबीज केली. यावेळी शेतकरीहितासाठी पॅनल काम करणार असल्याचे मत पॅनल प्रमुख माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार शिरीष चौधरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच

जल्लोष केला.

जामनेरात भाजपाचा सर्व 18 जागांवर विजय

जामनेर। अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे नेतृत्वाखाली भाजपाच्या सहकार पॅनलने ही निवडणूक पहिल्यांदाच स्वबळावर लढवून सर्वच्या सर्व 18 जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. तर संजय गरुड यांचे नेतृत्वाखाली काँग्रेस ,राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गट अशा महाविकास आघाडीचा सुपडा साप झाला आहे. त्यांना एकही जागा मिळवता आली नाही.