मुंबई-आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवांसह शाळा-महाविद्यालये आणि स्कूलबस, दूध- भाजीपाला वगळण्यात आले असून बंददरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी मोर्च्याला हिंसक वळण लाभले आहे. नाशिक, मुंबई येथे आंदोलकांनी बसची तोडफोड केली.
मराठा समाजास आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत सरकारने जाहीर केलेली ७२ हजार जागांवरील नोकरभरती स्थगित करावी या व अन्य मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. सोमवारी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले आहे. मंगळवारी दादरच्या शिवाजी मंदिर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत बुधवारच्या मुंबई बंदचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवारच्या बंदमधून काही जिल्हे वगळण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यंत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंददरम्यान निघणाऱ्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार आणि हिंसा होणार नाही अशी माहिती समन्वय समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली. मराठा समाजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा बैठकीत ठराव करण्यात आला.