जिल्ह्यातील मास्टरमाईंडमुळे ईव्हीएममध्ये घोटाळा

0

लोकसभेतील पराभव मान्य नाही, ईव्हीममध्ये घोळ झाल्याचा केला आरोप ; राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक

जळगाव- लोकसभा निवडणुकीनंतर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रसेची जिल्हा बैठक झाली. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचा पराभव झाला. जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी मतमोजणीच्या आधीच आमच्या 42 जागा व उत्तर महाराष्ट्रात 8 जागा येतील इतके खात्रीपूर्वक कसे सांगू शकतात, तसेच आपले उमेदवार देवकर व विरोधी भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील यांना प्रत्येक फेरीतील मतांचा टक्केवारी शेवटपर्यंत कामय कशी राहीली अशा प्रकारे संशय व्यक्त करीत संतप्त कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करतांना इव्हीएम घोटाळ्याचा मास्टरमाईंड जळगाव जिल्ह्यातीलच असल्याचा आरोप केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक शुक्रवारी दुपारी 3 वाजता जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. दुपारी 3 वाजता सुरु होणार्‍या या बैठकीसाठी साडेतीन वाजेपर्यंत जिल्हाध्यक्ष व निवडक पदाधिकार्‍यांसह अवघे 60 जणच उपस्थित होते. कार्यकत्यांची प्रतिक्षा करुन अखेर बैठकीस सुरुवात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड रविंद्र पाटील, अल्पसंख्याक सेलचे पदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार दिलीप सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, अभिषेक पाटील, निला चौधरी, रमेश मकासरे, वाल्मिक पाटील, शितल साळी, उज्वल पाटील, माधुरी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काही तालुकाध्यक्ष व कायकर्ते उपस्थित होते.

झाले गेले विसरुन पुन्हा जामोने कामाला लागा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघात सामान्य नागरिक व शेतकरी मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेच्या बाजूने होता. मतदान केल्याचे देखील सर्वच सांगतात. मात्र, निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव झाला, असे कसे झाले ? मग ही मते कोठे गेलीत? असे प्रश्न उपस्थित करीत जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी इव्हीम मशिनवर संशय व्यक्त केला. जे झाले, ते झाले पण आता खचून न जाता पदाधिकारी व कायकर्त्यांनी पुन्हा जोमाने विधानसभेसाठी कामाला लागण्याचे आवाहन देखील त्यांनी शेवटी केले. तालुकाध्यक्षांनी आपल्या भागातील चारा- पाणी टंचाई व शेतकरी कर्जाच्या समस्यावरुन आंदोलने करण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. पायल आत्महत्येच्या घटनेचा निषेध केला.

पदाधिकार्‍यांसह, कार्यकर्त्यांचा इव्हीएमवर रोष
22 लाख मतपेट्या गायब झाल्यात त्यातून हे घोळ होत आहे, अशा भावना व्यक्त करत उपस्थित तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी इव्हीएम मशिनीवरच आपला रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी कार्यकत्यांना शांत करीत इव्हीएम घोळ निश्चित असल्याचे स्पष्ट करीत मात्र, पुरावे नसल्याने जास्त बोलता येत नाही असे सांगीतले. यावेळी भुसावळ येथील नाना पाटील यांनी आगामी निवडणुका बलेट पेपरवर न झाल्यास उमेदवार देणार नाही असा ठराव बैठकीत मांडला. त्यास सर्वांनीच मान्यता दिली.

आपण केलेल्या कामांचेही आत्मपरिक्षण करा
यावेळी अनेक तालुकाध्यक्ष यांनी आपल्या पक्षात गेल्या काही वर्षात नेतेच जास्त झाले आहेत. त्या तुलनेत कार्यकर्तेे कमी असल्याने देखील संघटनात्मक कार्यात अडचणी येत असल्याचे सांगत नेत्यांना चिमटे घेतले. यापुढे नेते व पदाधिकार्‍यांनी देखील बुथरचनेची जबाबदारी घ्यावी अश्या सूचना केल्यात. युवक अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केवळ इव्हीएमवर पराभव ढकलून चालणार नाही, आपण कीती कामे केले ? याचेही आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे सांगीतले.