नवी दिल्ली: देशातील प्रसिद्ध मसाला कंपनी एमडीएच (महाशिया दी हट्टी) चे संस्थापक, मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज गुरुवारी पहाटे 5.38 वाजता निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ‘असली मसाले सच सच एमडीएच एमडीएच’ या जाहिरातीमुळे ते देशातील लहान, थोरांच्या ते परिचयाचे झाले होते. व्यापार आणि उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचा गेल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मभूषणने सन्मान केला होता. धर्मपाल हे जगातील सर्वात वयोवृद्ध अॅडव्हरटाईज स्टार होते. अगदी वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असतानाही ते जोशपू्र्ण आणि तंदुरुस्त होते.
गुलाटी यांचा जन्म 27 मार्च, 1923 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. 1947 च्या फाळणीमध्ये ते भारतात आले होते. तेव्हा त्यांच्याकडे केवळ 1500 रुपये होते. भारतात आल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी टांगा चालवायला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी पैसे जमवत दिल्लीच्या करोलबागमध्ये एक मसाल्याचे दुकान उघडले. या एका दुकानावरून त्यांनी देशाची प्रसिद्ध कंपनी उभी केली. आज त्यांच्या एमडीएच कंपनीच्या भारतातच नाही तर दुबईतदेखील फॅक्टरी आहेत. त्यांच्या एकूण १८ फॅक्टरी आहेत. याद्वारे ते जगभरात पोहोचले आहेत. एमडीएचची ६२ उत्पादने आहेत.