नवी दिल्ली- #Me Too मोहिमेतंर्गत आता आणखी एका काँग्रेस नेत्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. कालच काँग्रेसने लैंगिक छळाचा आरोप झाल्याने एनएसयूआच्या अध्यक्षाचा राजीनामा घेतला होता. एका महिला पत्रकाराने काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील मंत्र्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
सोनल केलॉग या महिला पत्रकाराने आघाडी सरकारमधील मंत्र्याचे नाव जाहीर केलेले नाही. पण महिला पत्रकारांना काम करताना कुठल्या परिस्थितीतून जावे लागते ते सांगितले आहे. एशियन एजच्या मालकाने गुजरातमधील आवृत्ती बंद केल्यानंतर सोनल केलॉग यांना २००६ साली दिल्लीला जावे लागले. त्यावेळी केलॉग यांच्याकडे एका केंद्रीय मंत्रालयातील बातम्या कव्हर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या नेत्याकडे मंत्रिपद होते. प्रसारमाध्यमांमध्ये लोकप्रिय असलेला या नेत्याचे शिक्षण दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये झाले होते.
हा नेता नेहमी माझ्या शरीराला स्पर्श करायचा. चुंबन घेऊन स्वागत करायचा असे केलॉग यांनी लिहिले आहे. तो नेहमी चुंबन घेऊन माझे स्वागत करायचा. मला वाटायचे कि, ही दिल्लीमधली पद्धत असावी. मी गुजरातमधून आली होती. तिथे अशी पद्धत नव्हती. गुजरातमध्ये मिठी मारणे किंवा चुंबन घेणे असे प्रकार नव्हते.
अनेकवेळा हा नेता माझा चेहरा पकडून माझ्या ओठांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करायचा असे केलॉग यांनी लिहिले आहे. २०१४ साली मी या मंत्र्याला त्याच्या दिल्लीतील बंगल्यामध्ये भेटायला गेली होती. माझ्याशी बोलत असताना हा नेता वॉशरुमला जाण्यासाठी म्हणून उठला त्यावेळी त्याने माझ्याबरोबर अत्यंत अश्लील वर्तन केले.