मुंबई-भारतात सध्या #Me Too मोहिम जोर घेत आहे. बॉलीवूड, राजकीय आणि इतरही क्षेत्रातील महिला आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहे दरम्यान प्रख्यात लेखक आणि जाहिरात क्षेत्रातील दिग्गज सुहेल सेठ यांच्यावरही आरोप करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून टाटा समुहातील टाटा सन्स या कंपनीने सुहेल सेठ यांच्यासोबतचा करार मोडण्याचा निर्णय आज जाहीर केला. सुहेल सेठ हे टाटा सन्सचे सल्लागार होते.
सुहेल सेठ यांच्यावर पाच महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. सोशल मीडियावरुन या महिलांनी छळाला वाचा फोडली होती. एका महिलेने ऑगस्ट २०१० मधील घटनेचा दाखला दिला होता. आपण १७ वर्षांच्या असताना सेठ यांची ‘फॅन’ म्हणून ट्विटरवर त्यांना फॉलो करीत होतो. मात्र एकदा त्यांनी संदेश पाठवून त्यांच्यासोबत मद्यपान करण्याचे आमंत्रण दिले, तसेच आपल्याला लज्जा वाटेल असाही संदेश आपल्याला पाठवला, असे महिलेने म्हटले होते.
मॉडेल आणि बिग बॉस-८ ची स्पर्धक डायेंड्रा सोरेसनेही सुहेल सेठ यांच्यावर आरोप केले होते. सुहेल सेठ यांनी पार्टीदरम्यान माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. इतकचं नाही तर त्यांनी माझं बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना प्रतिकार करत मी जोरात त्यांच्या जीभेचा चावा घेतला. याप्रकारानंतर सुहेल सेठ यांना प्रचंड वेदना होऊन ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे कळवळू लागले. मात्र त्यांना दिलेली ही शिक्षा त्यांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे, असे डायेंड्रा म्हणाली होती. आणखी तीन महिलांनीही सुहेल सेठ यांच्यावर अशाच स्वरुपाचे आरोप केले होते.