लंडन : वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना उद्या बुधवारी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी कसून सराव केला. या सराव सत्रानंतर संघ व्यवस्थापनाने पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेला खलील अहमद, अवेश खान आणि दीपक चहर यांना पाठवले. पत्रकार परिषदेला संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री किंवा संघातील वरिष्ठ खेळाडू येणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने नाराज झालेल्या मीडियाने परिषदेवर बहिष्कार टाकला.
संघ व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेसाठा नेट बॉलर्संना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे चहर व अवेश या परिषदेला गेले. त्यामुळे मीडियाने या परिषदेवर बहिष्कार घातला. प्रसारमाध्यमांनी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर नाराजी प्रकट केली. भारतीय संघाचे सदस्य नसलेल्या खेळाडूंना पत्रकार परिषदेत पाठवण्यात काय अर्थ, असा सवाल प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंनी केला. या निर्णयाबाबत विचारणा केली असता संघ व्यवस्थापक म्हणाले,”भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहिमेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.” 2015मध्येही कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रत्येक पत्रकार परिषदेला हजर असायचा, तर संघातील प्रमुख खेळाडू फक्त BCCI TVकडेच बोलायचे.