भाजपाचे गरज सरो, वैद्य मरोचा नवीन अंक सुरु; उद्धव ठाकरे

0

मुंबई: राज्यात विधानसभा निकाल लागून आठवडा झाला आहे, तरी सेना, भाजपामधील सत्ता संघर्ष थंड होण्याची चिन्हे दिसत नाही. शिवसेना आपल्या मुद्द्यावर ठाम असून मुख्यमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली असून, भाजपाचे ‘गरज सरो, वैद्य मरो’ चा दुसरा अंक सुरु झाल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व मानतो. महाराष्ट्राचा वैचारिक पाया धर्म आणि नीती यावर टिकून आहे. महाराष्ट्राच्या राजकारणास चार दिशा आणि चार पाय फुटले आहेत. राज्याच्या हितासाठी हे बरे नाही. असे म्हटले आहे.

निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यात समान वाटा आणि मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. समान वाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतानाच, शिवसेनेने लोकसभा निवडणुकीवेळी भाजपकडून दिलेल्या आश्वासनाची वारंवार आठवण करून दिली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. २०१४ मध्ये देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली यश मिळताच भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली आणि २०१९ मध्ये तसेच यश मिळाल्याप्रमाणे गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक सुरू झाला आहे, असं मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

येथे वैद्य मरणार नाही. त्याच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे आणि ती महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. मुख्यमंत्री हे सत्तापद नाही व त्याचे समान वाटप करता येणे शक्य नसेल असे कुणाला वाटत असेल तर त्या बिन सत्तेच्या पदासाठी देशभरात इतका आटापिटा कशासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे.