मुंबई: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याला बँकांनी मोठा दणका दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील गीतांजली जेम्स ही कंपनी विक्रीला काढली जाणार आहे. कर्ज देणाऱ्या बहुतांश बँकांनी निराकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली १८० दिवसांची मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. गीतांजली जेम्सचे अधिकारी विजय कुमार गर्ग यांनी स्टॉक एक्स्चेंजला ही माहिती दिली. ‘सीओसीनं कर्ज निराकरण प्रक्रियेसाठी दिलेली मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळं आता कंपनी विकण्यात येणार आहे,’ असं गर्ग यांनी सांगितलं. ऑक्टोबर २०१८मध्ये एनसीएलटीच्या मुंबई शाखेनं कंपनीविरोधात आयसीआयसीआय बँकेनं दाखल केलेली याचिका स्वीकारली होती. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी पीएनबी बँकेत केलेल्या घोटाळ्यानंतर सरकारी यंत्रणांनी चौकशी सुरू केल्यानंतर या प्रकरणात दाखल केलेली ही पहिली याचिका होती. गीतांजली जेम्स या कंपनीकडे बँकांची १२, ५५८ कोटी रुपये थकबाकी आहे.