नवी दिल्ली – पीएनबी बँक घोटाळ्यात भारताचा फरार आरोपी मेहुल चोक्सीला अँटिग्वा आणि बारबुडा या देशांचे नागरिकत्व दिल्याच्या वृत्तानंतर या कॅरिबियन देशामध्ये राजकीय भूकंप आला आहे. येथील विरोधी पक्षांनी या मुद्दावर पंतप्रधान गॅस्टन ब्राउन याच्यांकडे उत्तर मागितले आहे.
२०१४ पासून आतापर्यंत चोक्सीसोबतच २८ अन्य भारतीयांनी अँटिग्वाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. या २८ लोकांपैकी ७ लोकांना एक जानेवारी ते ३० जून २०१७ दरम्यान अँटिग्वाचे नागरिकत्व मिळाले आहे. या सर्व लोकांनी या देशामध्ये जवळपास २ लाख डॉलरची गुंतवणूक केली आहे. अँटिग्वा कोणत्याही नागरिकाला दुहेरी नागरिकत्व प्रदान करते. यासाठी विदेशी नागरिकांना तेथील नॅशनल डेव्हलपमेंट फंड (NDF) किंवा रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी लागले. एकदा अँटिग्वाचा पासपोर्ट मिळाल्यानंतर १३२ देशांमध्ये विना व्हिसा प्रवास केला जाऊ शकतो व प्रत्यार्पणही केले जात नाही.
अँटिग्वाच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड कॉर्पोरेट गर्वनन्सच्या एका सहामाही अहवालात ७ भारतीय नागरिकांना अँटिग्वाचे नागरिकत्व दिल्याचे समोर आले आले. अँटिग्वामध्ये नागरिकता प्रदान प्रक्रिया सुरू केल्यानंतर एकूण १,१२१ लोकांनी अर्ज केला होता. यामध्ये २.५ टक्के लोक भारतीय नागरिक आहेत. या लिस्टमध्ये सर्वाधिक ४७८ लोक चीनचे नागरिक आहेत. चोक्सीला नोव्हेंबरमध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व मिळाले होते. अन्य भारतीयांच्या नावांचा उल्लेख आढळत नाही. दरम्यान अँटिग्वाच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार विरोधकांनी विदेशी नागरिकांना नागरिकत्व दिल्याच्या मुद्यावर सरकारकडे उत्तर मागितले आहे.