मेहुल चोक्सीच्या कंपनीशी अरुण जेटली यांची मुलगी व जावाईचा आर्थिक संबंध-कॉंग्रेस

0

नवी दिल्ली- पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी निरव मोदी यांचे मामा मेहुल चोक्सी याच्या गीतांजली जेम्स या कंपनीसोबत अर्थमंत्री अरुण जेटलींची मुलगी सोनाली जेटली आणि जावई जयेश यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच याप्रकरणी अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यासंबंधी अनेक नवे खुलासे सादर केले.

काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर आर्थिक घोटाळ्यातील फरार आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकारच्या ४४ महिन्यांत कार्यकाळात २३ घोटाळेबाजांनी देशाला ५३ हजार कोटी रुपयांचा चुना लावला आहे. त्याचबरोबर अर्थमंत्री अरुण जेटली आणि त्यांच्या कुटुंबियांचे मेहुल चोक्सीसोबत लागेबंधे असून जेटलींनी त्वरीत आपला राजीनामा द्यावा अन्यथा या प्रकरणी स्वतंत्र तपास करण्यात यावा अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

जेटली असोसिएट्सने मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्स लिमिटेडकडून रिटेनरशिपसाठी २४ लाख रुपये घेतले होते. २०१६मध्ये पीएमओकडून सर्वे तक्रारी अर्थमंत्र्यांकडे पाठवल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. तर डिसेंबर २०१७मध्ये सोनाली जेटली आणि जयेश यांच्या जेटली असोसिएट्सला गीतांजली जेम्सने २४ लाख रुपये रिटेनरशिपपोटी दिले. त्यानंतर १ जानेवारी २०१८ रोजी नीरव मोदी आमि ४ जानेवारी रोजी मेहुल चोक्सीने भारत सोडल्यानंतर ३१ जानेवारी रोजी सीबीआयने मेहुल आणि अन्य लोकांवर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली. तर १५ फेब्रुवारी २०१८ला या प्रकरणी दुसरी एफआयआर दाखल करण्यात आली असे सचिन पायलट यांनी सांगितले.