नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचे अखेर विलिनीकरण होणार आहे. आज बुधवारी २३ रोजी झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली.
या दोन्ही कंपन्या बंद होणार अशी चर्चा होती. मात्र केंद्राच्या या निर्णयामुळे दोन्ही कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून बीएसएनएलवर मोठा अन्याय झाला. त्यामुळे बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाबरोबरच कामगारांच्या व्हीआरएसची योजनाही आखण्यात येत असल्याचे रविशंकर प्रसाद सांगितले. कर्मचाऱ्यांना व्हिआरएसचे आकर्षक पॅकेज देण्यात येणार आहे. व्हीआरएस योजनेनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचे वय ५३ वर्ष असेल तर त्याला वयाच्या साठीपर्यंत १२५ टक्के पगार मिळेल. व्हीआरएसचा अर्थ स्वेच्छेने निवृत्ती घेणं. याचा अर्थ जबरदस्ती नव्हे, असंही ते म्हणाले. याशिवाय ४जी स्पेक्ट्रमसाठी ४ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या ४ वर्षात ३८००० कोटी रुपये मोनेटाइज करण्यात येणार आहे. तसेच १५ हजार कोटींचे बाँड जारी करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितले.