मुक्ताईनगर- समाजातील मुलींचे घटते प्रमाण व जलबचतीचे महत्त्व कळण्यासाठी निमखेडीच्या वधूने लग्नपत्रिकेतून ‘बेटी बचाव’ सह ‘जलसंवर्धनाचा’ संदेश देऊन समाजात आदर्श उभा केला आहे. लग्नपत्रिकेत नातेवाईकांसह, प्रेषक,संयोजक, आयोजक, निमंत्रक आदींची मर्जी सांभाळता-सांभाळता वधू-पित्याची त्रेधा-तिरपीट उडते मात्र या पत्रिकेतून समाजाला आगळा-वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.
तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील रवीना महादेव तायडे या नियोजित वधूचे 8 मे रोजी यावल तालुक्यातील चिंचोली येथील भरत दत्तात्रय सोळुंके या वरासोबत लग्न आहे. अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून रवीनाने बी.ए. (इंग्रजी स्पेशल)एवढे शिक्षण घेतले असून संगणकाचे कोर्स देखील ती करत आहे.
आई आणि वडील दोघे शेतीकाम करणारे, शिक्षणाचा त्यांचा जवळीक संबंध नाही मात्र मुलं शिकतात त्यांना शिकू द्यावे म्हणून परिस्थितीचा विचार न करता आपल्या मुलीला आई सविता व वडील महादेव भिवसन तायडे यांनी बी.ए.(इंग्रजी स्पेशल)केल. सर्वसामान्य कुटुंबातील असतानाही आई-वडीलांचे शिक्षणाप्रती असणारे प्रेम पाहून रवीनानेदेखील आपल्या प्रमाणेच इतर मुलींनीदेखील शिकावे, असा उद्देश डोळ्यात ठेवून आपल्या स्वतःच्या लग्न पत्रिकेमध्ये ‘बेटी बचाव बेटी पढाव’ चा संदेश दिला आहे.
‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ असा संदेश देतानाच हिंदीमध्ये ‘बेटी को मत समझो भार, बेटी है जीवन का आधार’ असा मौलिक संदेश देखील पत्रिकांमध्ये छापण्यास आपल्या पालकांना भाग पाडले आहे. मुलींप्रमाणेच पाणीदेखील हे जीवनावश्यक बाब असून ‘जल है तो जीवन आहे’ ’पाण्याचा जपून वापर करा’ असादेखील संदेश पत्रिकेद्वारे देण्यात आला.
जनजागृती होत असल्यानेच संदेश
पत्रिका ही नातेवाईक आप्तेष्ट व आपल्या गोतावळ्यामध्ये मनापासून वाचली जाते त्यामुळे बेटी बचाव सारखा किंवा पाणी वाचण्यासारखा संदेश त्यातून असेल तर जनजागृती होते या हेतूने प्रेरीत होऊनच मी लग्नपत्रिकेत स्वतः हा संदेश दिला असल्याचे नियोजीत वधू रवीना तायडे म्हणाली.