#MeToo : एम. जे. अकबर यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

0

नवी दिल्ली : लैंगिक गैरवर्तनाचा आरोप असलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी तातडीने आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून अकबर यांच्या घराबाहेर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दरम्यान, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना या प्रकरणी ताब्यात घेतले.

एम. जे. अकबर यांनी आपल्या परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करणाऱ्या घोषणा सोमवारी अकबर यांच्याघराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. अकबर यांनी काल परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर आपल्यावरील लैंगिक गैरवर्तनाचे आरोप फेटाळून लावले. तसेच आपल्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या  या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसने हा पवित्रा घेतला.

एम. जे. अकबर हे पत्रकार असून त्यांच्या पत्रकारितेतल्या काळात त्यांनी अनेक पत्रकार महिलांशी गैरवर्तन केल्याचा दावा काही महिलांनी मीटू मोहिमेच्या माध्यमातून केला आहे. मात्र, अकबर यांच्यावर आरोप करण्यात आले त्यावेळी ते सरकारच्यावतीने परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांनी यावर भाष्य करणे टाळले होते. मात्र, रविवारी ते भारतात परतले. त्यानंतर त्यांना विमानतळावरच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरले. मात्र, आपण यावर लवकरच स्पष्टीकरण देऊ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही तासातंच त्यांनी आरोपांवर प्रतिक्रिया दिली. या संदर्भातील सर्व आरोप फेटाळत या प्रकारामुळे आपली प्रतिमा मलिन झाली असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. तसेच आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.