मुंबई: अभिनेत्री केट शर्मा हिनं सुभाष घई यांच्याविरुद्धची लैंगिक छळाची तक्रार मागे घेतली आहे. पोलीस या प्रकरणी कोणतीच कारवाई करत नसल्याने आपण तक्रार मागे घेतली आहे, असा खुलासा केट शर्माने केला आहे.
केट शर्मा हिनं सुभाष घई यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. याबद्दल केटने सोशल मीडियावर रीतसर पोस्ट लिहिली होती. नंतर याबाबत पोलिसात तक्रारही दाखल केली होती. मात्र, सुभाष घईंनी केटचे सगळे आरोप फेटाळले होते.
‘माझ्या पोस्टचं समर्थन करण्याऐवजी खिल्लीच जास्त उडवण्यात आली. #मीटू चळवळीच्या माध्यमातून अनेक मुली व्यक्त होत आहेत, पण एकाही आरोपीला अटक होत नाहीय. पोलीस काहीच कारवाई करणार नसतील तर तक्रार दाखलच का करावी,’ असा सवाल तिनं केला आहे. माझी आई आजारी आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा अधिक पाठपुरावा करण्याची ताकद माझ्यात नाही, असंही केट शर्मानं स्पष्ट केलं आहे.