पुणे :- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील म्हसे येथे सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना अचानक वधूचे निधन झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दुपारी लग्न झालेल्या वधूचा सायंकाळी अचानक मृत्यू झाला.
जयश्री मुसळे (वय-22), असे या नववधूचे नाव आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे येथील बबन मुसळे यांच्या हिरामण व दिंगबर या दोन मुलांचा विवाह 6 मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील सख्या मावसबहिणी असलेल्या जयश्री गोंडा व विजय धर्मन्ना भंगर्गी यांच्या बरोबर थाटामाटात म्हसे येथे दुपारी बारा वाजता उत्साहात झाला. त्यानंतर अक्कलकोटवरुन आलेल्या आई-वडील व व-हाडी आनंदाने परतीच्या मार्गाकडे निघाले. दरम्यान नववधू असलेल्या जयश्रीला सायंकाळी अचानक ताप आल्याने ग्रामस्थांनी तातडीने तिला शिरुर येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान जयश्रीची प्राणज्योत मालवली होती. अंगाला हळद असताना सुखी संसारांची स्वप्न पाहणाऱ्या जयश्रीच्या अकाली जाण्याने म्हसे गावावर शोककळा पसरली.