सोलापूर – राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘म्होरक्या’चे निर्माते कल्याण पडाल यांनी आत्महत्या केली. आतड्याच्या कर्करोगाला कंटाळून वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या पडाल यांना काविळही झाला होता.
कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात कल्याण पडाल यांची जगण्याची झुंज सुरु होती. मात्र त्यांच्या इच्छाशक्तीवर कर्करोगाबाबतची निराशा वरचढ झाल्याने अखेर आजाराला वैतागून पडाल यांनी स्वतःचे जीवन संपवले. सोलापुरातील राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. कल्याण पडाल यांच्या ‘म्होरक्या’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने या सिनेमाबाबत मोठी उत्सुकता होती. हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र आता कल्याण पडाल यांच्या आत्महत्येमुळे हा सिनेमा वेळेत रिलीज होईल, की पुढे ढकलला जाईल, याबाबत साशंकता आहे.