आता दुध दर प्रश्नी मंत्रालयासमोर वाटणार फुकट दुध!

0

दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

मुंबई:- दुधाला सरकारने जाहीर केल्या प्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या या प्रमुख मागणीसाठी राज्यभर फुकट दुध वाटप आंदोलन सुरु आहे. राज्यातील सर्व दुध उत्पादक जिल्ह्यांमध्ये आंदोलन होऊनही सरकारने दुध उत्पादकांची उपेक्षा अद्यापही थांबविली नसल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे. दिनांक ३ मे पासून राज्यभरातील सर्व दुध उत्पादक जिल्ह्यात दुध उत्पादक “लुटता कशाला फुकटच न्या” म्हणत फुकट दुध वाटत आंदोलन करत आहेत.

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पासून दुध उत्पादक शेतकरी तहसील कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आमचा तळतळाट सरकार पर्यंत पोहचवा’ म्हणत फुकट दुध वाटप करणार आहेत. भाजपच्या आमदार, खासदार व मंत्र्यांना खास आमंत्रण देऊन तहसील कार्यालयांवर दुध पिण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. तालुका व जिल्हा स्तरावर या काळात ठिकठीकाणी रास्तारोको आंदोलने करण्यात येणार आहेत. इतके करूनही आंदोलनाची दखल न घेतल्यास मुंबई मंत्रालयासमोर धडक देत मंत्रालयासमोरच फुकट दुध वाटप आंदोलन करण्यात येणार आहे.

मंत्रालया समोर होणा-या आंदोलनाच्या तयारीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी व बीड जिल्ह्यात संघर्ष समितीचा व्यापक दौरा आयोजित करण्यात आहे. राज्यभरातील दुध उत्पादक व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करून आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. हजारोंच्या संख्येने मंत्रालयाकडे कूच करत मंत्रालयासामोरच दुध वाटपाचे आंदोलन करण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. आज पुणे जिल्ह्यातील दुध उत्पादक व संघटना बरोबर संपर्क साधण्यासाठी संघर्ष समिती पुणे जिल्ह्याचा दौरा करत आहे. उद्या दिनांक ६ मे रोजी नाशिक जिल्ह्यातील दुध उत्पादक व संघटना प्रतिनिधी यांच्याशी नाशिक जिल्ह्याचा दौरा करून संघर्ष समिती संपर्क करणार आहे. या नंतर अहमदनगर व औरंगाबाद बरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी व बीड जिल्ह्याचा दौराही संघर्ष समिती करणार आहे.

सरकारने जाहीर केलेला दर शेतक-यांना मिळावा यासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर दुध उत्पादकांना त्यांच्या खात्यावर सरळ अनुदान देऊन जाहीर दर व प्रत्यक्ष दर यातील अंतर भरून काढा. दुध पावडरच्या निर्यातीसाठी अनुदान द्या, शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करा व दुध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी टाळण्यासाठी पर्यायी दुध धोरणाचा स्वीकार करा या मागण्या दुध उत्पादक संघर्ष समिती करत आहे.

यावेळी डॉ.अजित नवले ( राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा ), धनंजय धोरडे ( शेतकरी नेते) विठ्ठल पवार, अनिल देठे, साईनाथ घोरपडे, संतोष वाडेकर, नाथा शिंगाडे, महारुद्र डाके, दिगंबर तुरकने, किरण वाबळे, संतोष हांडे, डॉ. किशोर खिलारे, संदीप मचे आदी उपस्थित होते.