दूध प्रश्नावर मुख्यमंत्री आंदोलकांशी करणार चर्चा

0

मुंबई – राज्यभरात गेल्या आठवड्यापासून दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र, उद्या मुख्यमंत्री आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. यासंदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या मध्यस्थीने ही बैठक होणार आहे.

दूध उत्पादकांच्या अडचणी ऐकून घेऊ, त्याचबरोबर सरकार दूध संघावर करत असलेल्या कारवाईबाबतही उत्पादकांना माहिती देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात सांगितले.

दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर मिळण्याच्या मागणीसाठी​ राज्यभरातील सर्व दूध उत्पाद​कांनी ३ मे पासून ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत फुकट दूध वाटत आंदोलन​ सुरू केले आहे. हे आंदोलन अधिकच तीव्र करण्याच्या उद्देशाने थेट मंत्रालयासमोरच आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने आंदोलकांशी चर्चेची तयारी दर्शवल्याचे आंदोलकांचे नेते आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

मंत्रालयासमोर होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी व बीड जिल्ह्यात संघर्ष समितीचा व्यापक दौरा आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातील दूध उत्पादक व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करून आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. हजारोंच्या संख्येने मंत्रालयाकडे कूच करत मंत्रालयासामोरच दूध वाटपाचे आंदोलन करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. ​

पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक व संघटनांबरोबर संपर्क साध​ल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील दूध उत्पादकांच्याही संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेला​ २७ रुपयांचा ​दर शेतकऱ्यांना मिळावा यासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर दूध उत्पादकांना त्यांच्या खात्यावर सरळ अनुदान देऊन जाहीर दर व प्रत्यक्ष दर यातील अंतर भरून काढा. दूध पावडरच्या निर्यातीसाठी अनुदान द्या, शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करा व दूध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी टाळण्यासाठी पर्यायी दूध धोरणाचा स्वीकार करा, या मागण्या दूध उत्पादक संघर्ष समितीने केल्या आहेत. सरकारने या मागण्यांचा सकारातमक विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी अधिक तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही नवले यांनी दिला आहे.