मंत्री महाजनांच्या नावाने धमकावून, पैशांच्या जोरावर मनपाला हाताशी धरुन घर हडपले ?

0

गायकवाड कुटुंबियांचा आरोप ; 60 वर्षापासूनच्या घरावर अतिक्रमण विभागाचा हातोडा

जळगाव- गेेल्या 40 वर्षापासून वास्तव्य करीत असलेले घर मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाने धमकावून तसेच पैशांच्या जोरावर महापालिका तसेच वकीलांना हाताशी धरुन नगरसेवक कैलास सोनवणे हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंडीत गायकवाड यांच्या कुटुंबियांनी केला आहे. सासर्‍याला डांबून ठेवून जबरजस्तीने खरेदीखतावर ठसे घेत नगरसेवक सोनवणे यांनी घर हडप करण्याचा प्रयत्न केला. तसेच गिरीश महाजन माझ्या पाठीशी असून, ही जागा तुम्हाला खाली करावीच लागेल अशीही धमकी सोनवणे यांनी दिल्याचे गायत्री गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीवरुन शुक्रवारी गणपती नगरातील घराचे बांधकाम पाडण्यास गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण पथकाच्या जेसिबीसमोर उभे ठाकून गायकवाड कुटुंबियांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. पोलीस बंदोबस्तात घराचा काही भाग पाडण्यात आला. यावेळी गायकवाड परिवारातील महिलांना मन सुन्न करणारा आक्रोश होता.

बांधकाम पाडाल तर जीव देवू…
या इमारतीचे बांधकाम हे बेकायदेशिर असल्याची तक्रार संजय भास्कर पाटील यांनी मनपा नगररचना विभागाकडे केली होती. मनपा नगररचना विभागाने 2 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात हे बांधकाम प्रशांत टाटीया व कैलास सोनवणे यांच्या मालकीच्या जागेवर व सध्या गोविंद गायकवाड यांच्या ताब्यात आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याने निष्कासीत करण्याचे निदेश आदेशात दिले आहेत. नगररचना विभागाने हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगितल्यानंतर गायकवाड कुटूंबियांना यासंबधीचे कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी कागदपत्रे सादर न केले नाहीत. त्यामुळे महिनाभरात हे घर खाली करण्याचे आदेश मनपाने गायकवाड कुटुंबियांना दिले होते. मुदतीनंतरही घर खाली न केल्याने शुक्रवारी सकाळी 11 वाजता मनपा अतिक्रमण व नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी गणपती नगरात जावून ही इमारत पाडण्यास सुरुवात केली. दुमजली इमारतीची बाल्कनी पाडल्यनातंर पंडित गायकवाड यांच्या सून कल्पना गायकवाड, मुलगा तुषार, नातसून गायत्री यांनी हे बांधकाम पाडणार्‍या मनपा कर्मचार्‍यांना विरोध केला. तसेच बांधकाम पाडण्याचा प्रयत्न केला तर जेसीबीच्या समोर येवून जीव देण्याचा इशारा कुटुंबियांनी दिल्याने तणाव निर्माण झाला होता.

कैलास सोनवणेंकडून धमकावून बळजबरीने खरेदी व्यवहार
शहरातील गणपती नगरातील पंडित गायकवाड यांच्या मालकीची इमारत असून ते 108 वर्षाचे आहे. या घरात त्यांचा मुलगा गोविंद गायकवाड, पत्नी कल्पना गायकवाड, नातु तुषार गायकवाड व नातसून गायत्री गायकवाड हे राहतात. ही इमारत पंडित गायकवाड यांनी 2015 मध्ये कैलास सोनवणे व प्रशांत टाटीया यांना विक्री केल्याची तलाठ्यांकडे नोंद आहे. घरपट्टी गायकवाड यांच्या नावावर असली तरी जागेसह इमारत सोनवणे व टाटीया यांच्या नावावर आहेत. मात्र, हा खरेदीचा व्यवहार धमकी देवून बळजबरीने केल्याचा आरोप गायकवाड कुटुंबियांचा केला असून या प्रकरणी न्यायालयात कामकाज सुरु आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना कारवाई केली जात असल्याबद्दलही गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आपण बाजारात गेलो असतांना बाजारात गेल्यानंतरही सोनवणे यांनी धमकी दिल्याचा तसेच या जागेच्या बदल्यात शहरात इतर भागात नवीन प्लॉट देण्याचेही आमीष दिल्याचा आरोप पंडित गायकवाड यांच्या नातसून गायत्री गायकवाड यांनी केला.