खान्देशातही भाजपा विरोधकांना सुरुंग लावणार

0

गिरीश महाजन म्हणाले गुलाबराव देवकर दोन वेळा भेटले ः मनिष जैन हे माझ्या जवळच असतात ; महाजनादेशयात्रेच्या नियोजनाबाबत पत्रकार परिषदेत दिली माहिती

जळगाव- राज्यात भाजप पक्षाकडून विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोडाफोडचे राजकारण सुरु आहे. महाजनादेशायात्रेदरम्यान अनेकांचा भाजपात प्रवेशही झाला आहे. यादरम्यान 8 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची महाजनादेशयात्रा जिल्ह्यात येत आहे. यावेळी खान्देशातील विरोधकांना भाजप सुरुंग लावणार असून अनेकांचा यावेळी भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता, त्यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर मला दोन वेळा भेटले आहेत. तर मनिष जैन हे माझ्या जवळचे असल्याचे सांगितले आहे. कुणाचा होणार हे सांगणे जरी महाजन यांनी टाळले असले तरी मात्र प्रवेशासोहळा होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

महाजनादेशयात्रा 8 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. त्याबाबत झालेले नियोजन तसेच कार्यक्रमाच्या माहितीसाठी सोमवारी अजिंठा विश्रामगृहात जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार स्मिता वाघ, महापौर सीमा भोळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाजनादेशयात्रेसह मंत्री महाजन यांनी जळगावसह जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, रखडलेले प्रकल्प तसेच आगामी काळात होवू आगामी काळात होवू घातलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

महाजनादेश यात्रा दोन दिवस जिल्ह्यात
महाजनदेशयात्रेला जिल्ह्यात बोदवड तालुक्यातील घाणखेडा येथून सुरुवात होणार यानंतर जामनेर तसेच भुसावळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची जाहीर सभा होणार आहे. यानंतर जळगाव शहरातीलही जाहीर सभा होणार आहे. या महाजनादेशयात्रेचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरु असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. तसेच नंदुरबार येथे 9 ऑगस्ट रोजी महाजनादेशयात्रेचा समारोप होणार त्यांनी सांगितले.

मंत्री महाजन म्हणाले गुलाबराव देवकर दोनदा भेटले…
आगमन होत असलेल्या महाजनादेशयात्रेदरम्यान जिल्ह्यासह खान्देशातील काही विरोधी पक्षातील नेते भाजपत प्रवेश करणार काय ? हा प्रश्‍न विचारला असता मंत्री महाजन म्हणाले की, गुलाबराव देवकर यांनी दोनवेळा माझी वेळ भेटली घेतली आहे. तर विरोधी पक्षातील माजी आमदार मनिष जैन हे तर माझ्या जवळच राहतात. तर गुलाबराव देवकरांसोबत काय चर्चा झाली असे विचारले असता, जिल्ह्यातील विविध विषयावर चर्चा झाली असल्याचे सांगत त्यांनी मूळ मुद्याला महाजन यांनी बगल दिली. धुळे जिल्ह्यातील खासदारकीचे उमेदवार कुणाला पाटील यांचाही पक्षात येण्यासाठी आग्रह असल्याचे उत्तर महाराष्ट्रातील 100 टक्के जण भाजपात येण्यास इच्छुक आहेत. मात्र सर्वांना घेता येणार नाही. पुढील दोन दिवसात सर्वांना कळेलच की कुणाकुणाचा प्रवेश होणार असे सांगत सर्वांचा जळगावच्या सभेत हा प्रवेशसोहळा होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

देशाच्या प्रतिष्ठेचा निर्णय
जम्मू आणि काश्मिरबाबतचा सरकारने घेतलेला निर्णय हा स्वांतंत्र्यप्राप्तीनंतरचा एैतिहासिक निर्णय आहे. पक्षात यंदा स्पष्ट बहुमत असल्याने हा निर्णय घेता आला. या निर्णयाचा देशात जल्लोष सुरु आहे असे सांगत मंत्री महाजन यांनी कार्यकर्ता असतांना दोडा बचाव आंदोलन, लाल चौकात झेंडा फडकाविण्याच्या झालेल्या निर्णयावेळी जिल्ह्यातून गेलो होतो. जम्मू काश्मिरचा प्रश्‍न हा देशाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न होता. व केंद्रीय संरक्षण मंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद मोदी यांनी निर्णय घेवून पवित्र कार्य केले व देशाच्या प्रतिष्ठेचा निर्णय घेतला. आज नाही तर कधीच नाही हा प्रश्‍न सुटला असता अशी प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी दिली. तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

बॅलेट पेपरवर निवडणुकीला तयार
राज ठाकरेंनी ईव्हीएमविरूध्द सध्या देशभर दौरे सुरू केले आहे. सर्व्हेतही मनसेचा कुठेही उल्लेख नसतो. लोकांना काय अपेक्षित आहे हे आम्हाला माहिती आहे. निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तर बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्या. त्यानंतरही आम्हाला एक टक्का देखील फरक पडणार नाही. ईव्हीएमपेक्षा नागरिकांच्या, शेतकर्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी मोर्चे, आंदोलने करावी असा सल्ला मंत्री महाजन यांनी दिला आहे.

जळगावकरांना थोडा त्रास होणार,
सुरेशदादांशी पुन्हा चर्चा करणार

जळगाव शहराचा वर्षभरात कायापालट करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार अमृत योजना आणि भूमिगत गटारींची कामे सुरू झाली आहे. विकासकामे सुरू असल्याने जळगावकरांना थोडा त्रास सहन करावा लागेल. राज्यात आम्ही अनेक ठिकाणी विरोधात आहोत. जळगावात आम्ही मनापासून एकत्र असून शहराच्या विकासासाठी सहकार्याची भावना ठेवावी यासाठी शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन, मनपा गटनेते नितीन लढ्ढा यांच्याशी बोललो होतो. पुन्हा एकवेळ त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करेल असे ना.गिरीष महाजन यांनी सांगितले.

हुडको कर्ज, गाळेधारकांचा प्रश्न सुटणार
जळगाव मनपावर असलेल्या हुडको कर्जासंदर्भात 2-3 बैठका झाल्या. 467 कोटींवर 267 कोटींपर्यंत शासनाने कमी करण्यास सहमती दर्शविली असून ते 200 कोटीपर्यंत करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना नगरविकास खात्याकडून 200 कोटी रूपये देण्यास विनंती केली असून त्यांनी होकार दिला असल्याचे ना.महाजन यांनी सांगितले. तसेच गाळेधारकांचा प्रश्न अंतिम टप्प्यात आलेला असून आमदार, महापौर व इतर मनपा पदाधिकार्यांच्या दररोज त्याप्रश्नी बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली असून कायद्याच्या चौकटीत राहून यावर या आठवड्यात तोडगा निघेल असे त्यांनी स्पष्ट केले.

मला मुख्यमंत्री व्हायचं नाही
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम मुख्यमंत्री आहे. त्यांना पुन्हा एकवेळ संधी द्यावी. ते असताना मला मुख्यमंत्री होण्याची गरज भासत नाही. परंतु शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो. राज्यात आमचं चांगले सुरू आहे. पक्षाने मला पुन्हा मंत्री केले तर आनंद होईल असे सांगून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य गंमतीशीरपणे केलेले असल्याचेही ना.महाजन यांनी स्पष्ट केले.

राज्यात 1 कोटी चष्म्यांचे वाटप
आगामी काळात सीएसआर, जी.एम फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून दृष्टीयज्ञ अभियान राबविण्यात येणार आहे. यात नंबरची तपासणी केल्यावर जागेवर चष्मे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार राज्यात 1 कोटी जनतेला चष्म्याचे वाटप करण्याचे उद्दीष्ट आहे. या दृष्टीयज्ञ अभियानाचा परवा जामनेरपासून शुभारंभ होत आहे. त्याचप्रमाणे 7 रोजी होत असलेल्या कार्यक्रमात दिव्यांगांना 200 मोटारसायकलीचे वाटप करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.