मुंबई – जामखेडमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्या आर्शिवादाने गुंडगिरी सुरु असून जामखेडचं बिहार केल्याचा आरोप करतानाच राम शिंदे यांची तात्काळ हकालपट्टी करावी आणि दोषींवर चार्जशीट दाखल करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
हे देखील वाचा
अहमदनगरमध्ये २८ एप्रिलला राष्ट्रवादीच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. देशी कट्टा वापरुन ही हत्या करण्यात आली. जामखेडमध्ये डॉ.शेख यांच्यावरही असाच हल्ला झाला होता. राम शिंदे हे अहमदनगरचे पालकमंत्री आहेत. या नगरमध्ये परमनंट अधिकारी कामावर नाहीत. अधिकारी काम करायला तयार नाही. इथे कायदयाचं राज्य नाही. मंत्र्यांच्या मनाचा कारभार सुरु असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.
गुंडांचा वापर करुन राजकारण करण्याचे काम मंत्री करत आहेत. राम शिंदेंच्या आर्शिवादाने ही गुंडगिरी सुरु असून राम शिंदे यांच्या माने तालमीमध्ये हे गुंड पोसले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या भागात लक्ष घालावे आणि राम शिंदे यांची तात्काळ हकालपट्टी करावी व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली.