दोषी आढळल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देईल-सुभाष देशमुख

0

सोलापूर : भाजपचा आणखी एक मंत्री अडचणीत आला आहे. सोलापुरातील वादग्रस्त बंगल्याच्या बांधकाम प्रकरणात सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणी वाढल्या आहेत. कारण त्यांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिला आहे. मात्र दोषी आढळल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देईल तसेच बंगला बेकायदेशीर असल्यास स्वखर्चाने पाडेल असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.

तीन पट जास्त बांधकाम

देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेत आहे. या बंगल्याखालची जमीन महापालिकेच्या अग्निशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. त्याठिकाणी देशमुख यांनी आपला टोलेजंग बंगला बांधला आहे. दोन एकराच्या या जागेत सहकार मंत्री सुभाष देशमुखांचा प्लॉट २२ हजार २४३ स्क्वेअर फुटांचा आहे. त्यावर त्यांनी ९४२५ स्क्वेअर फूट बांधकामाची अधिकृत परवानगी घेतली. पण प्रत्यक्षात तीन पट जास्त बांधकाम झाल्याचा अंदाज आहे.

आयुक्त रजेवर

देशमुख यांना २००१ मध्ये बंगल्याच्या बांधकामासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर देशमुख यांनी पुढील प्रत्येक बाबीला आपण जबाबदार राहू असे प्रतिज्ञापत्र दिले. त्या आधारावर सोलापूर महानगरपालिकेने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना सशर्त बांधकाम परवाना दिला होता. अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर हा बंगला बांधल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अहवालात सुभाष देशमुख यांच्या बंगल्याच्या बांधकामावर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान हा अहवाल देऊन सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे रजेवर गेल्याचे कळते.

बंगला जमीनदोस्त करा-धनंजय मुंडे
सुभाष देशमुख यांना एक मिनिटही मंत्रिपदावर कायम राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करत बंगला तातडीने जमीनदोस्त करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.