अल्पसंख्यांक विभागाचे वृक्षारोपण मोहिमेशी वावडे

0

मुंबई| राज्यशासनाच्या वन विभागाने यंदाच्या वर्षी 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्या वृक्ष लागवडीच्या सप्ताहाची सुरुवात 1 जुलैपासून झाली. तेव्हापासून शासनाच्या अखात्यरित असलेली 27 विभागे दररोज इमाने-इतबारे जेवढी वृक्षारोपण करत असतात, त्यांची नोंद करत आहेत, मात्र याला केवळ अल्पसंख्यांक विभाग हा एकमेव अपवाद ठरत आहेत. या विभागासाठी 37 हजार 500 वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. या मोहिमेच्या सप्ताहाचा शुक्रवारी शेवट झाला, तरीही या विभागाने पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत एकदाही नोंद केली नाही. त्यातून या विभागाने एकही रोपटे लावले नाही, असा अर्थ त्यातून ध्वनित होत आहे, त्यामुळे वृक्षलागवडीच्या या मोहिमेचे आणि अल्पसंख्यांक विभागाचे वावडे आहे का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. महाफॉरेस्ट या सरकारच्या संकेतस्थळावर सरकारमधील विविध विभाग वृक्षलागवडीची संख्या दररोज नोंदवत असत.

वक्फ बोर्डाच्या जमिनींवर रोपे लागलीच नाहीत
या वृक्षारोपण मोहिमेच्या अंतर्गत अल्पसंख्यांक विभागाला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अखत्यारीत येणार्‍या मोकळ्या भूखंडावर ही वृक्ष लागवड करावयाची होती. राज्यातील अनेक मस्जिद, दर्गे, मदरसा यांच्या जागा वक्फ मंडळाच्या अखत्यारीत येतात. तेथील आजूबाजूच्या आणि मोकळ्या जागांवर ही वृक्ष लागवड करायची होती, त्यासाठी 37,500 वृक्षारोपणाचे उद्दीष्ट देण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने या विभागाच्या पुढे शून्य दिसत आहे. या सप्ताहांतर्गत किती वृक्षारोपण केले, किती जणांनी सहभाग घेतला इत्यादी सर्व रकान्यामध्ये नुसता शून्य दिसत आहे. यासंबंधी अल्पसंख्यांक विभागाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, आमच्याकडे कोणत्याच जिल्ह्यातून अद्याप माहिती आली नाही, त्यामुळे झाडे लावली का, किती लावली, कुठे लावली याची काहीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही, असे बेजबाबदारपणाची उत्तरे देत आहेत.

गृहनिर्माण विभागाची केवळ औपचारिकता
या मोहिमेच्या अंतर्गत गृहनिर्माण विभागासाठी 75,000 वृक्षारोपणाचे उद्दीष्ट ठरवून दिले होते, त्यापैकी 7, 525 रोपांसाठी 5,395 खड्डे खोदून ठेवले असल्याची माहिती या विभागाने संकेतस्थळावर दिली आहे. तर पर्यटन आणि सांकृतिक विभागाकडून दिलेल्या उद्दिष्टापैकी काहीच वृक्षलागवड केली असली तरी त्यात किती जणांचा सहभाग होता याची माहिती दिली नाही, त्यामुळे नेमकी वृक्ष लागवड झाली का की या शासकीय विभागांकडून हे मनाचे श्लोक संकेतस्थळावर अद्ययावत केले जात आहेत, अशी शंकाच या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title- minority department ignored plantation drive