महात्मा गांधी विद्यालयाच्या अनुदान रकमेत ४५ लाखाचा अपहार – कारवाईची मागणी
अपहाराच्या रकमेची लेखा परिक्षण अहवालात नोंद मात्र,कारवाई करण्यास होतेय टाळाटाळ
वरणगांव । प्रतिनिधी
दि. वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलीत महात्मा गांधी विद्यालयाचे तत्कालिन संस्था अध्यक्ष,सचिव , शाळा समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांचेकडे वेतनेतर अनुदान गैरवापर केल्या प्रकरणी तक्रारी करण्यात आल्या होत्या.मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने शिक्षणाधिकारी यांचेकडे पुराव्यानिशी अर्ज सादर केले त्यानुसार चौकशी समितीने केलेल्या चौकशी अहवालात ४५ लाख रुपयाचा अपहार झाल्याचे नमुद केले असुनही प्रशासनाकडून दोषींना अभय देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने दोषींवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .
वरणगांव व परिसरात नावाजलेल्या दि. वरणगांव एज्युकेशन सोसायटी संचलीत महात्मा गांधी विद्यालयाच्या कारभारात सन – २०१५ -१६ पासून ते २०२२-२३ प्राप्त वेतनेतर अनुदानाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अपहार होत असल्याचे संस्थेचे तत्कालीन संचालक रविंद्र भागवत कोल्हे, निळकंठ रामदास सरोदे, सुधाकर बळीराम जावळे , संजय भागवत ढाके , राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांचेसह अकरा संचालक यांनी तत्कालीन शाळा समिती चेअरमन चंद्रकांत हरी बढे ( सर ), सचिव व मुख्याध्यापक यांचकडे अनुदान रक्कम गैरवापर प्रकरणी अर्ज केला होता . मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. यामुळे त्यांनी शिक्षणाधिकारी जळगाव यांचेकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी दि.२६ / ७ / २०२१ रोजी उपशिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले . त्यानुसार झालेल्या चौकशीचा अहवाल समितीने दि.२३/०२/२०२२ रोजी शिक्षण विभागास अहवाल सादर केला. मात्र, शिक्षण विभागाच्या चौकशी समितीने जाणीवपूर्वक वेतनेतर अनुदान अपहार व गैरव्यवहारावर पांघरुण घालण्यासाठी संचालकांचे जबाब घेणे, प्रोसेडींग बुक तपासणे, संचालकांचे अंतर्गत वाद व इतर शिक्षण विभागाशी संबध नसलेले अधिकार बाह्य विषयांची अनावश्यक नोंदी अहवालात नमूद करून शासनाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याबाबत वरीष्ठ पातळी पर्यंत पुराव्यानिशी तक्रार केल्याने चौकशी अहवालात अपहार व गैरव्यवहाराच्या नोंदी घेण्यात आल्या तसेच चौकशी अहवालानुसार पाठपुरावा केल्याने शिक्षणाधिकार्यांनी दि.२/८/२०२२ रोजी शासकीच लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले. मात्र, लेखापरिक्षणाचे आदेशानंतरही संबंधीतांकडुन टाळाटाळ दिरंगाई केली जात असल्याचे निदर्शनास येताच मा. लोकायुक्त, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे पाठपुरावा केल्यानंतर दि.९/०५/२०२३ रोजी शासकीय लेखापरिक्षण अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला .
*???????? लेखा परिक्षण अहवालात यांच्यावर ठपका*
शिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात तत्कालीन संस्थाध्यक्ष वंदना भागवत पाटील, सचिव चंद्रशेखर भागवत झोपे, मुख्याध्यापक आर. आर. निकुंभ, आर.ए.वाघ व वंदना किशोर चव्हाण यांचे सन -२०१५ -१६ ते २०२२-२३ या कार्यकाळात अपहार – गैरव्यवहार झाल्याचे नोंदीत आहे .
*???????? असा झाला अपहाराचा व्यवहार*
लेखा परिक्षण अहवालात वेतनेतर अनुदानातुन चंद्रकांत हरी बढे यांचे जावई तत्कालीन उपशिक्षक बी.एम . पाटील (सर) यांना ११ लाख ६९ हजार देण्यात आलेली रक्कम अमान्य करण्यात आली असून माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभागाचे वेतनेतर अनुदानाची अंदाजे १०लक्ष रुपयाची अखर्चित रक्कम ( खर्च न झालेली व बँक खात्यात शिल्लक नसलेली रक्कम ) तसेच अटी शर्तीचे उल्लंघन करून संस्थेच्या खात्यात वर्ग केलेली रक्कम , बनावट बिले दाखवून खर्च केलेली रक्कम असे एकुण ४५ लाख ६९ हजार ४६५ रुपये शासकीय रक्कम वसुलीपात्र ठरविण्यात आलेली . सदर रक्कम पदाधिकारी व अधिकारी यांचेकडुन तात्काळ वसुली करुन शासनाकडे जमा करणे व त्यांचेवर कायदेशीर करणे आवश्यक आहे . मात्र, प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने संबंधितांना पुरावे नष्ट करणे व यापुढेहि प्रवेश फी वगैरे च्या भ्रष्टाचारास जाणीवपुर्वक संधी उपलब्ध केली जात आहे .त्यामुळे सर्व संबंधितांविरुद्ध लवकरच योग्य त्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे तक्रारदारांनी सांगितले . परीसरांत नावाजलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या कारभारात गैरव्यवहारामुळे विद्यार्थी सोयी सुविधांपासुन वंचित झाल्याने परिसरांत खळबळ उडाली आहे .