भाजप आमदार आशिष देशमुखांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

0
स्थिती सुधारली नाही तर नागपुरातही हार पत्करावी लागेल असे प्रतिपादन 
निलेश झालटे 

नागपूर – काटोल मतदार संघातल्या अनेक गावांमध्ये कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, तरीही त्याची नोंद घेण्यात आलेली नाही. ही स्थिती सुधारली नाही, तर भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यातही हार पत्करावी लागेल, असा इशारा भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी दिला आहे. ही स्तिथी न सुधारल्यास आपल्याला टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विधानसभेत विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते.
बावनकुळेंवर किती विश्वास ठेवायचा?
देशमुख पुढे म्हणाले की, त्यांच्या काटोल मतदार संघातल्या अनेक गावांमध्ये कापसावर बोन्ड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, तरीही त्याची नोंद घेण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या यादीत त्या गावांचा समावेशदेखील झाला नाही. दिवंगत कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना खरीप हंगामाच्या बैठकीत ही गोष्ट निदर्शनास आणली होती. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांना भरपाईच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. देशमुख यांनी ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आपल्या भाषणात अविश्वास दाखवला. बावनकुळे यांच्या कोणत्या आश्वासनावर किती विश्वास ठेवायचा? ते सर्वांना माहीत आहे, या शब्दात त्यांनी बावनकुळे यांना लक्ष्य केले.