आदिशक्ती श्री संत मुक्ताई मंदिर बांधकामाचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
मुक्ताईनगर प्रतिनिधी |
आदिशक्ती संत मुक्ताई (समाधी स्थळ- कोथळी) मुक्ताईनगर या तीर्थक्षेत्री हेमांड पंथी लूक स्वरूपात मंदिर जीर्णोद्धाराचे काम गेल्या अनेक वर्षांपासून निधी अभावी रखडलेले होते. यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे या मंदिरा बांधकासाठी नवीन DSR रेट नुसार वाढीव निधीची तरतूद व्हावी तसेच रखडलेल्या कामाचा मागील निधी तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू ठेवलेला होता. याच अनुषंगाने मागील काळात मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडून येथील रखडलेला निधी तात्काळ उपलब्ध करण्याच्या सूचना करून नवीन डीएसआर रेटनुसार नव्याने 15 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली होती.
तसेच यानंतर लागलीच 2.50 कोटी रुपये निधी व नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी 2.50 कोटी असे एकूण पाच कोटी रुपये रखडलेल्या निधी अंतर्गत येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने संबंधित ठेकेदाराने रखडलेला मंदिर बांधकामाला सुरुवात केलेले असून जिर्णोद्धाराचे काम युद्ध पातळीवर सुरू केलेले आहे.या कामाची पाहणी करण्याकरता आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताई चे कामदा एकादशी निमित्त दर्शन घेऊन या कामाची पाहणी केली तसेच आदिशक्ती मुक्ताई मंदिरासमोरच असलेल्या नदी घाटावर मंदिराच्या पूर्वेच्या दिशेने येथे मुक्ताईनगर तसेच खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाविकांना शॉर्टकट मार्ग व्हावा यासाठी या नदीवर पादचारी छोटू पूल निर्माण करण्याच्या सूचना संबंधित बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत तसेच येथे प्रशस्त असे भव्य प्रसादालय निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या असून तात्काळ प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केलेले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून नवीन पादचारी पुल निर्माण होणार असल्याने भाविकांना तसेच मुक्ताईनगर वासियांना पायदळ वारी करणे तसेच पायदळ दिंडी द्वारे येणाऱ्या भाविकांना हा अत्यंत सोयीचा व शॉर्टकट मार्ग होणार असल्याने भाविकांतर्फे समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांचेसह संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, संत मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज , नगरसेवक संतोष मराठे उपस्थित होते .