पिकविम्यावरून आ. स्मिता वाघ यांचा सरकारला घरचा आहेर

0

शेतकर्‍यांना विम्याचा लाभ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा

जळगाव- अमळनेर तालुक्यातील सात मंडळांमधील शेतकरी अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे पीक विम्यापासून वंचित राहीले असल्याचे सांगत भाजपाच्या आमदार स्मिता वाघ यांनी एकप्रकारे सरकारला घरचा आहेर दिला आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांची भेट घेणार असुन शेतकर्‍यांना पीकविम्याचा लाभ न मिळाल्यास आंदोलनास बसणार असल्याचा इशारा भाजपाच्या आमदार स्मिता वाघ यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिला.
जिल्ह्यातील पीकविम्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, शेतकरी यांची बैठक झाली. यावेळी भाजपाच्या विधानपरीषद आमदार स्मिता वाघ उपस्थित होत्या. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना आमदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, अमळनेर तालुक्यातील सात मंडळांमधील शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी कार्यालयात बसुन पिकांचे पंचनामे केले आहे. कुठल्याही पंचनाम्यावर शेतकरी, सरपंच यांच्या स्वाक्षर्‍या नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वावडे मंडळातील १८८६ शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. अमळनेर तालुक्यात अशी परिस्थीती असेल तर जिल्ह्यात काय चित्र असेल? असा सवाल आमदार स्मिता वाघ यांनी उपस्थित केला. यासंदर्भात पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांची भेट घेणार असुन शेतकर्‍यांना पिकविम्याचा लाभ न मिळाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशाराही आमदार स्मिता वाघ यांनी दिला.

कृषी अधिकारी वारेंमुळे शेतकरी वार्‍यावर
अमळनेर तालुक्याचे कृषी अधिकारी वारे यांच्यासंदर्भात शेतकर्‍यांच्या अनेक तक्रारी आहेत. मी देखिल स्वत: त्यांची तक्रार केली. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. कृषी अधिकारी वारे यांच्या गलथान कार्यपध्दतीमुळे शेतकरी वार्‍यावर असल्याचे आमदार स्मिता वाघ यांनी सांगितले.