मनसेची भाजपवर खोचक टीका; गाजर विवाह सोहळ्याचे आयोजन

0

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत भाजपविरोधात प्रचार करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाह या जोडगोळी विरोधात प्रचारसभा घेतल्या आहेत. राज ठाकरे यांनी सभामध्ये व्हिडियो दाखवत भाजपवर टीका केल्यानंतर आता, चक्क अनोख्या असा गाजर विवाह आयोजित केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई आयोजित चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई यांचा गाजर विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे

खोटय़ा आश्वासन कृपेने 29 एप्रिल रोजी 56 इंचाच्या मुहूर्तावर हा सोहळा होणार असून, जॅकेटवाला फुगा, विनोदी मंत्री, पिस्तुलधारी गिऱ्या हे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील, अशी पद्धतीने भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. नवी मुंबईतील मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी या लग्नाची पत्रिका आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. युती सरकारने खोट्या घोषणा, खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केल्याचा आरोप राज ठाकरे करत आहेत. नवी मुंबई मनसैनिकांनी भाजप सेनेला कोपरखळी काढण्यासाठी हा गाजर विवाह सोहळा आयोजित केल्याचे गजाजन काळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वीही गजानन काळे यांनी राजनाथसिंह यांना पत्र पाठवून शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आपल्या गाडीत बसण्याची संधी द्यावी, असे म्हणत तावडे यांची खिल्ली उडवली होती.