शहरातील हॉटेलात मद्यप्राशन करतांना एका टेबलवर बसण्यावरून वादाचे झाले निमित्त ; काही तासातच संशयितांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
जळगाव – शहरातील एका प्रसिध्द हॉटेलात मद्यप्राशन करत असताना एका टेबलावर बसण्यावरुन हॉटेलात हाणामारी झाली. या हाणामारीनंतर घरी परतेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी शहर उपाध्यक्ष घनःशाम शांताराम दिक्षीत वय 35 रा. ईश्वर कॉलनी यांचा दगडाचा ठेचून खून झाल्याची रविवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास समोर आली आहे. रविवार शासकीय सुटी असल्याने शासकीय पंच मिळत नसल्याने मृतदेह हलविण्यास तब्बल साडेतीन तास विलंब झाला होता. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्यास स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांच्या ताफ्याने घटनास्थळ गाठले. गुन्हा दाखल होताच काही तासातच पोलिसांनी सनी उर्फ चाळीस वसंत पाटील रा. रामेश्वर कॉलनी व मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा.सबजेल मागे, जळगाव) अशी संशयितांची नावे निष्पन्न करुन त्याच्या शहरातून मुसक्या आवळल्या. हॉटेलमधील हाणामारीचे या घटनेला निमित्त झाले असले तरी प्रत्यक्षातील मूळ काहीतरी वेगळे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.अ निष्पन्न झालेले दोनही संशयित खून व प्राणघातक हल्लयाच्या प्रकरणात कुख्यात चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे याच्यासोबत आरोपी असून दोन्ही दोन्ही जामीनावर बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
भाजी गरम करुन ठेव,
मी जेवणाला येत आहे
शाम दिक्षित हे आई शोभा, भाऊ घनशाम, बहिण ममता जंजाळे, वहिणी, पत्नी, दोन मुले, या कुटुंबासोबत ईश्वर कॉलनीत साईबाबा मंदिराजवळ वास्तव्यास होता. त्याचे वडीलांचे आठ ते दहा वर्षापासून निधन झाले आहे. भाऊ सुतारी काम करतो, तर शाम दिक्षीत हे लोकांचे दाखले तसेच खरेदी विक्री व्यवहार अशी कामे करुन देत असे. 24 रोजी दुपारी शाम दुपारी एक वाजेच्या सुमारास आईला सांगून कामानिमित्ताने बाहेर पडले. दुपारी 3 वाजेच्या सुमारास पुन्हा घरी आला. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. रात्री 12 वाजेच्या सुमारास शाम यांनी पत्नी भाग्यश्री हिला भाजी गरम करुन ठेव मी जेवणाला येत आहे, असा फोन केला.
पंचाअभावी मृतदेह हलविण्यास साडेतीन तास विलंब
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तसेच एमआयडीसी पोलीस निरिक्षकांसह पोलीस ठाण्याचा ताफा घटनास्थळी हजर झाला. चहू बाजूंनी घटनास्थळाची केली. यानंतर पंचनामा करण्यासाठी रविवारी सुटी असल्याने पंच मिळत नसल्याने अधिकार्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. साडेवाजेच्या उघड झालेल्या घटनेनंतरही पंच मिळत नसल्याने मृदतेह हलविण्यास तब्बल साडेतीन तास विलंब झाला. अखेर 10 वाजून 5 मिनिटांनी दोन पंच आले. त्याच्यासमक्ष पंचनामा करण्यात येवून 10.30 वाजेच्या सुमारास मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
महापालिका निवडणुकीत घेतली होती माघार
ललीत कोल्हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष असताना शाम दिक्षित हा शहर उपाध्यक्षपदी होते. कोल्हे यांनी मनसे सोडल्यानंतर शाम दिक्षीतही मनसेतून बाहेर पडले. दिक्षित यांचा मोठा जनसंपर्क होता. तहसील कार्यालयातून दाखला काढून देणे, खरेदी विक्रीची कामे यासह सामाजिक कार्यही ते करत होते. दरम्यान यंदाच्या महापालिकेत निवडणुकीत नगरसेवक पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता मात्र ललीत कोल्हे यांच्या सांगण्यावरुन त्यांनी माघार घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कुणाशी कुठलेही वैमनस्य अथवा वाद, भांडण नसतांना त्यांचा दगडाने ठेचून मारण्या इतपत काय घडले, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मयत शाम याच्या पश्चात आई, भाऊ वहिनी, पुतणे, पत्नी व दक्ष व त्रृतू अशी दोन मुले असा परिवार आहे.
नागरिकांना दिसला मंदिराच्या मैदानात मृतदेह
रात्री शाम दुचाकीने घरी आला. दुचाकी अंगणात लावली. आईला वाटले पत्नीसोबत वरच्या खोलीत असेल व पत्नीला वाटले खालच्या खोलीत असेल म्हणून सर्व झोपून गेले. सकाळी 6 वाजेच्या सुमारास शाम रात्री घरात नसल्याची माहिती न मिळाल्यावर कुटुंबियांनी शामच्या मोबाईलवर फोन लावण्यास सुरुवात केली. मात्र फोनची बेल वाजत होती, शाम फोन उचलत नव्हता. यानंतर शामच्या भाऊ गणेश शामच्या मित्र सुधीर महालेकडे गेला. आम्ही दोन्ही रात्री सोबत घरी आलो यानंतर मी माझ्या घरी गेल्याचे सांगितले. पुन्हा घरी परतत असतांना सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ललीत उर्फ कालू काठेवाडी याने मंदिराजवळ मृतदेह पडला असल्याची माहिती. कुटुंबियांनी साईबाबा मंदिराच्या मैदानात जावून पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह शाम दिक्षीत याचा होता. याठिकाणी आईसह पत्नी, बहिणीने एकच आक्रोश केला. दगडाने ठेचून त्याचा खून झाल्याची खात्री झाल्यावर पोलिसांना फोन लावून माहिती देण्यात आली.
मोबाईल लॉक उघडेना
शामच्या मृतदेहाजवळ उजव्या हातावर रक्ताने माखलेला दगड पडलेला होता. तंबाखु, चुन्याची पुडी, गाडीची चाबी, हातरुमाल, मोबाईल, चार्जर, 50 रुपयाची नोट अशा वस्तू मिळून आल्या. मोबाईलचा लॉक असल्याने पोलिसांनी खूप प्रयत्न करुन लॉक उघडला. नाही अखेर शामच्या हाताची बोटे स्वच्छ करुन लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. मोबाईल अनेकांची फोन आलेली होती. विशेष म्हणजे मोबाईलवर पहाटे 3.20 वाजेच्या सुमारास खात्यातून 520 रुपये काढल्याचा संदेशही असल्याचे पोलिसांना दिसून आले. पंचनामा करुन पोलिसांनी सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
अटकेतील संशयितांवर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल…
पोलिसांनी या घटनेत निष्पन्न केलेल मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी व सनी उर्फ चाळीस वसंत पाटील याच्यावर यापूर्वी खुनाचा तसेच प्राणघातक हल्याचा गुन्हा दाखल आहे. दोघेही न्यायलयीन कोठडीत काही दिवस मध्यवर्ती कारागृहात होते. जामीन मिळाल्यानंतर दोघेही बाहेर आहेत. जमीनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून हा खून झाल्याची चर्चा आहे. नेमके संशयित ताब्यात घेतल्यावर खूनामागचे खरे कारण समोर येणार आहे.
हॉटेलमधील वादाचे निमित्त अन् काही वेळाने खून
शनिवारी रात्री शहरातील रिगल पॅलेस या हॉटेलमध्ये एका टेबलावर शाम दिक्षित व मित्र सुधीर महाले मद्यप्राशन करत होते. तर दुसर्या टेबलावर मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी व सनी उर्फ चाळीस वसंत पाटील रा. रामेश्वर कॉलनी हे दोघे मद्यप्राशन करत होते. मुन्ना शामला उद्देशून माझ्या टेबलाव ये असे म्हणाला. तर शामही मुन्नाला तुच माझ्या टेबलावर येत असे म्हणाले यावरुन शाब्दिक वाद होवू अरेरावी व धराधरी झाली. या वादानंतर 11.30 वाजेच्या सुमारास मोन्या हॉटेलातून निघून गेला. तर मद्यप्राशनानंतर सुधीर व शामही घरी आले. हॉटेलातील वादाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले. त्यातील मुन्नाला व सनी या संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्याच्या शोधासाठी तत्काळ पथकेही रवाना करण्यात आली. याच वादातून मध्यरात्री शामचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र यापूर्वीच्या पुर्ववैमन्यातून हा खून झाला असा अंदाज आहे.
अवघ्या पाच तासात संशयितांना अटक
सकाळपासून पोलीस चौकशीत असताना हा खून मोहनीराज उर्फ मुन्ना कोळी याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व एमआयडीसीचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी तपासाचे चक्र फिरविले. यात घनश्याम दिक्षीत याला ठार मारल्यानंतर सनी व मुन्ना दोघंही दुचाकीवरुन जामनेर तालुक्यातील पिंपळगावकडे पळाल्याचे समोर आले.
घटनेच्या मूळ कारणाचा पोलिसांकडून शोध
घनश्यामचा हॉटेलमधील वाद व मुन्ना याचे त्याच्याकडे असलेले 10 हजार रुपये व ही रक्कम चारचौघात मागितल्याच्या कारणावरुन ही घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांना या घटनेमागे आणखी वेगळे कारण असावे अशी शक्यता वाटत आहे, त्यादृष्टीने पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी व आनंदसिंग पाटील यांनी घटनेनंतर हॉटेलमधील त्याच्या चार जणांना ताब्यात घेतलेल्यांची चौकशी केली, मात्र त्यात त्यांच्याकडून फारशी माहिती मिळाली नाही. मुळ कारणाचा त्यांच्याकडून शोध घेतला जात आहे.
जंगलात पाठलाग करुन दोघांना पकडले
एमआयडीसीचे सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, मनोज सुरवाडे, विजय पाटील, हेमंत कळसकर, निलेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, अरुण राजपूत व रणजीत जाधव यांचे एक पथक पिंपळगावकडे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. विजय पाटील व नरेंद्र वारुळे हे पथकाला तांत्रिक माहिती पुरवित होते. त्यानुसार दोघं जण पाळधी येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना पाहून या दोघांनी दुचाकी सोडून जंगलात पळ काढला. पोलिसांनी चारही बाजुंनी पाठलाग करुन त्यांना घेरले आणि ताब्यात घेतले.