‘त्या’ हॉटेलातच झाला असता घनशाम दिक्षितचा खून

0

वादानंतर संशयित मोहनीराजने काढला होता चाकू ; सोबतच्या हिसकावून घेतला होता

जळगाव – शहरातील मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष घनशाम दिक्षीत यांची दगडाने ठेचून हत्या झाल्याची 24 ऑगस्ट रोजी घडली. उधारीच्या पैशांवरुन हा खून झाल्याचे कारण जरी चौकशीत समोर येत असले तरी उधारीचे पैशांवरुन वाद हे केवळ निमित्त ठरले असून नेमक्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान ज्यावेळी घनशाम दिक्षीत व मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी यांच्यात एका टेबलावर मद्यप्राशन करण्यासाठी बसण्यावरुन वाद झाला होता, या वादातून घनशाम यांना मारण्यासाठी मुन्ना याने जवळ असलेला चाकू काढला होता. मात्र मुन्ना सोबतच्या त्याच्या मित्राने तो हिसकल्याने घटना टळली होती, अन्यथा हॉटेलात घनशामचा खून झाला असता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात घनशाम दिक्षीत यांच्या खूनाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यात संशयित मोहनीराज उर्फ अशोक कोळी व सनी उर्फ चाळीस वसंत पाटील या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. ते पोलीस कोठडीत आहेत. कोठडीत संशयित मुन्ना याने घनशामकडे उधारीचे पैसे घेणे होते, त्यावरुन वाद झाला होता, यातून घटना घडल्याची कबूली दिली आहे. मात्र केवळ पैशांच्या वादातून हा खून होणे अशक्य असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मुन्नाने घनशामला मारायचेच ठरविल होते…
दरम्यान हॉटेलात ज्यावेळी वाद झाला, त्यावेळी संतापात घनशामने मुन्नाच्या कानशिलात लगावली. यावेळी मुन्नाने त्याच्याकडील चाकू काढला होता. सोबतच्या मित्राने हिसकावून घेतला होता. यानंतर रागाच्या भरात मुन्ना बाहेर पडला. आज घनशामचा कार्यक्रमच करतो, असे त्याने ठरविले होते. म्हणून सोबतच्या मित्राने त्याला घरी जाण्याचाही सल्ला दिला. मात्र घरी गेल्यावर वडील पुन्हा बाहेर निघू देणार नाही. म्हणून मुन्ना बाहेरच थांबला. डोक्यात घनशामला मारायचे भुत सवार असल्याने त्याने एक ते दोन जणांना फोन केला. सनीलाही फोन करुन मुन्नाने बोलावून घेतले. यानंतर बोलण्याच्या बहाण्याने मंदिराकडे घेवून जावून दोघांनी दगडाने ठेचून हत्या केली होती.

बहिणीला म्हणाला होता पैशांची मदत करशील
घनशामच्या खूनाच्या आधी, तसेच खूनानंतर मुन्नाने फोन केल्याचे त्याच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्सवरुन समोर आले आहे. त्यात घनशामची हत्या केल्यानंतर त्याच्या बहिणीला फोन केला होता. सद्यस्थितीतील जीवनाला कंटाळलो असल्याचे सांगत मला पैशांची मदत लागली तर करशील असे त्याने बहिणीशी बोलतांना सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजते.

नेमक्या कारणाचा पोलिसांकडून शोध
हॉटेलमध्ये जेव्हा वाद झाले त्यावेळी मुन्नाने जर सोबतच चाकू ठेवला होता. तर तो घनशामला मारायचे ठरवूनच घराबाहेर पडला होता काय? घनशामच्या खुन हा पूर्वनियोजीत कटातून झाला नाही ना? अशा सर्व बाजूंनी तपासअधिकार्‍यांनी गुन्ह्यात लक्ष केंद्रीत केले आहे. या सर्व बाजूंचा अभ्यास करुनच खूनाच्या नेमक्या कारणां तसेच यात आणखी कुणाचा सहभाग आहे काय? याचा शोध घेतला जात आहे.