रुडकी – भारतात आज १ जुलैपासून मोबाईल नंबर संदर्भात दूरसंचार मंत्रालयाकडून एक मोठा बदल करण्यात येत आहे. आजपासून सर्व मोबाईल नंबर १३ अंकांचे होणार आहेत. १ जुलाई २०१८ पासून नवीन नंबर घेणाऱ्या ग्राहकांना १३ अंकांचा मोबाईल क्रमांक मिळणार आहे. याची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आहे. सरकारने यासंबंधी सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत.
भारतात मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या ४७.८ कोटीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि कंटार-आईएमआरबी द्वारे संयुक्तरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात डिसेंबर-२०१७ मध्ये मोबाईल इंटरनेट युझर्सची संख्या १७.२२ टक्क्याने वाढून ४५.६ कोटीपर्यंत पोहचली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या अहवालानुसार देशात आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या दरात मोबाईल इंटरनेट उपलब्ध होत असल्याने युझर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतातील शहरी भागात प्रत्येक वर्षागणिक मोबाईल इंटरनेटचा वापर करणाऱ्या ग्राहकांमध्ये १८.६४ टक्क्यांनी वाढ होत आहे. तर ग्रामीण भागात डिसेंबर २०१६ – डिसेंबर २०१७ या काळात १५.०३ टक्क्याने वाढ झाली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की युझर्सची वाढती संख्या पाहून 10 आकड्यांचा मोबाईल क्रमांक आता जारी करणे शक्य नाही. त्यामुळे आता यापुढे दहापेक्षा अधिक आकड्यांच्या मोबाईल नंबरची सीरीज सुरू करण्यात येत आहे. यापुढे मोबाईल नंबर हा 13 अंकांचा राहणार, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.