मोदी सरकारकडून अजित डोवाल यांना मोठी भेट; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा !

0

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि उरी सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले अजित डोवाल यांना भारत सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. अजित डोवाल यांनी चीन सोबतचा डोकलाम विवाद, पाकिस्तानसोबतचा वाद आणि युद्धजन्य स्थितीमध्ये भारताची बाजू भक्कम केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवेळीही मोलाचे मार्गदर्शन केले होते. यामुळे त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये बहुमुल्य योगदान दिल्याने सरकारने डोवाल यांना पाच वर्षांसाठी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे.

अजित डोवाल यांनी बहुचर्चित राफेल विमानांच्या खरेदी आणि निवडीमध्येही महत्त्वाची भुमिका मांडली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन करत 303 जागांवर विजय प्राप्त केला आहे. यामुळे गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा भाजपाला आल्याने स्थिर सरकार मिळाले आहे. राष्ट्रीय संरक्षण रणनीती चांगल्याप्रकारे आखल्याचा फायदा भाजपाला झाला आहे. यामुळे डोवाल यांना हे पद देण्यात आले आहे. भारतासाठी डोवाल यांनी गुप्तहेराचेही काम केले आहे. ते पाकिस्तानच्या लाहोरमध्ये 7 वर्षे मुस्लिम बनून राहिले होते. त्यांना भारतीय लष्कराचा सर्वोच्च पुरस्कार कीर्ति चक्रानेही सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिऴविणारे ते पहिले अधिकारी होते. डोवाल हे 1968 च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांना चार वर्षांनी 1972 मध्ये आयबी मध्ये घेण्यात आले. त्यांनी जादातर काम गुप्तचर विभागातच केले आहे.