मोदी अॅनाकोंडा आहेत ते राष्ट्रीय संस्थांना खाणार-टीडीपी मंत्री

0

हैद्राबाद- केंद्र सरकार सीबीआय, आरबीआय या स्वायत्त संस्थेत हस्तक्षेप करीत असल्याने सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी काँग्रेससोबत आलेल्या आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगु देशम पक्षाने (टीडीपी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना ‘अॅनाकोंडा’ या अजस्त्र सापाशी केली आहे. मोदी अॅनाकोंडाप्रमाणे आहेत ते राष्ट्रीय संस्थांना पार गिळंकृत करून टाकतील असा आरोप करण्यात आले आहे. टीडीपीचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि राज्याचे अर्थमंत्री यनामाला रामकृष्नुदू यांनी मोदींपेक्षा मोठा दुसरा कोणताच अॅनाकोंडा नसल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीआय, आरबीआय आणि त्यासारख्या दुसऱ्या संस्थांना गिळंकृत करत आहेत. ते रक्षक कसे असू शकतील, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रदेश भाजपानेही टीडीपीवर पलटवार केला असून एन चंद्राबाबू नायडू हे भ्रष्टाचाराचे राजा असून त्यांच्या भ्रष्टाचारांचा आता खुलासा होईल, असा धमकीवजा इशाराच दिला आहे. सध्या देशाला भाजपापासून वाचवणे हेच टीडीपीचे तत्कालिक कर्तव्य असल्याचे रामकृष्नुदु यांनी स्पष्ट केले आहे.

प्रत्येक टॉम, डिक आणि हॅरी जुन्या राजकारणाबाबत बोलत आहे. सत्य हे आहे की, भूतकाळ वर्तमान किंवा भविष्य असू शकत नाही. पण वर्तमान आणि भविष्य जरुर एक दिवस भूतकाळ बनू शकेल. टीडीपीवर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, टीडीपी कोणत्या एका पक्षाविरोधात कधीच नव्हती. उलट हा पक्ष व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिला होता.

सध्याच्या परिस्थितीत देश, लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांना वाचवण्याची प्राथमिक जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे सांगत त्यांनी विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस आणि जन सेनावर निशाणा साधला. हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी हपापले असून त्यांना राष्ट्रीय जबाबदारीचे कोणतेही सोयरसूतक नाही. त्यामुळेच हे दोन्ही पक्ष मोदींचे समर्थन करत आहेत. मोदी राष्ट्रीय संस्था आणि लोकशाही उद्धवस्त करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे, प्रदेश भाजपा अध्यक्ष कन्ना लक्ष्मीनारायण म्हणाले की, एन चंद्राबाबू नायडू भ्रष्टाचाराचे बादशाह आहेत. त्यासाठी ते कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. जी व्यक्ती मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे असा प्रस्ताव २०१७ मध्ये एनडीएच्या बैठकीत सादर करते. तीच व्यक्ती आज मोदींना दोषी म्हणून सांगत आहे, किती विरोधाभास आहे.