मोदींनी ममता दीदींना केला फोन मात्र दीदींनी बोलणे टाळले !

0

कोलकाता:बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फॅनी चक्रीवादळाचा ओडीसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यांना फटका बसला आहे. दरम्यान पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ममतांनी मोदींशी बोलणे टाळल्याचे पीएमओ कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. एएनआयने पीएमओच्या हवाल्याने याबाबत ट्विट केले आहे.

शनिवारी सकाळी पीएमओकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोनवरुन संपर्क करण्याचा दोनदा प्रयत्न करण्यात आला. पहिल्यांदा पीएमओला सांगण्यात आले की, मुख्यमंत्री सध्या दौऱ्यावर आहेत. त्या परतल्यानंतर तुम्हाला फोन करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्यांदा फोन केल्यानंतरही पुन्हा पंतप्रधान कार्यालयाला मुख्यमंत्री आल्यानंतर फोन करण्यात येईल असे सांगण्यात आले.

ओडिशामध्ये फॅनी चक्रीवादळाने मोठे थैमान घातल्यानंतर हे वादळ शुक्रवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर जाऊन धडकेल असा अंदाज लावण्यात येत होता. यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आपले प्रचार दौरे रद्द केले होते. हे चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की, तृणमुल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराजी व्यक्त केली आहे. कारण, मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क न करता केवळ राज्यपालांशीच इथल्या स्थितीबाबत चर्चा केली. मात्र, हे वृत्त चुकीचे असल्याचे पीएमओने म्हटले आहे.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चांगलेच वाक् युद्ध रंगताना दिसते आहे. दोन्ही नेते निवडणूक सभांमध्ये एकमेशांवर निशाना साधण्यापासून मागे हटत नाहीएत.