वाराणसी:१७ व्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी आपला वाराणसीत मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी पोहोचले आहेत. शपथविधी होण्याआधीच नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले. नरेंद्र मोदी यावेळी बाबा विश्वनाथ आणि कालभैरवाचे दर्शन घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी संपुर्ण शहरात सजावट करण्यात आली असून, फुलांचा वर्षाव होणार आहे.
नरेंद्र मोदी रस्त्यामार्गे काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचतील. पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरामधील सात किमीचं अंतर ते बंद गाडीतून पार करणार आहेत. हा एका प्रकारचा रोड शो असणार आहे. यानंतर नरेंद्र मोदी समर्थकांना संबोधित करणार आहेत.नरेंद्र मोदी याआधी २५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी काशीत आले होते. तेव्हा रोड शो नंतर त्यांनी गंगा आरती केली होती. निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर आता बाबा विश्वनाथाचा अभिषेक करतील. जवळपास अर्धा तास मंदिरात पुजा चालणार आहे. नरेंद्र मोदी काशी विश्वनाथ मंदिरात येण्याची ही नववी वेळ आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनातून रविवारी संध्याकाळी या याबाबतची माहिती देण्यात आली. राष्ट्रपती भवनात गुरुवारी, ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता शपथविधी समारंभ होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधानांना आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपती कोविंद यांनीही ट्वीट करून शपथविधीबद्दल माहिती दिली आहे.