नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी काल निवडणूक होऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे हरिवंश नारायण सिंह हे विजयी झाले. यासाठी भाजपला अनेक घटकपक्षांनी मदत केली. दरम्यान शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे पंतप्रधान मोदींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून आभार व्यक्त केले.
राज्यसभेत शिवसेनेचे ३ सदस्य आहेत. निवडणुकीत निवडून येण्यासाठी त्यांचे मत मिळणे महत्त्वाचे होते. संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये उपसभापती पदासाठी गुरुवारी निवडणूक झाली होती. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी दिली होती.
मोदींनी फोन केल्यानंतर याचे पडसाद राजकीय पटलावरही पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसेना भाजपशी नाराज असल्येचे दिसत होते. ही दरी भरून काढण्यासाठी पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आहे असे म्हटले जात आहे. राज्यसभेत झालेल्या निवडणुकीमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी तर्फे बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना १०५ मतांवरच समाधान मानावे लागले. निवडून आलेले हरिवंश सिंहांचे पंतप्रधान मोदींनी सभागृहात जाऊन अभिनंदनही केले होते.