आज मोदी जपान दौऱ्यावर; अनेक निर्णय होण्याची शक्यता !

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून जपान दौऱ्यावर आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी हे आज पूर्ण दिवस आबे यांच्या यामानशी येथील लेक हाऊसमध्ये राहणार आहेत. हिंदी महासागरातील चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी जपानसह अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने आघाडी केली आहे. यामुळे चीनच्या मनसुब्यांना रोखण्यासाठी रणनिती आखण्यात येणार आहे.

मोदी 2 दिवसांच्या जपान दौऱ्यावर आले आहेत. हिंदी महासागराचे क्षेत्र आफ्रिकेच्या पूर्वेकडील तटापासून प्रशांत महासागरापर्यंत पसरलेले आहे. हे क्षेत्र दोन्ही देशांसाठी महत्वाचे आहे. मात्र, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे बाहेरील देश असल्याने आशिया खंडातील अन्य देशांचे मन वळविण्याचे काम भारत आणि जपानला करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेश, श्रीलंका आणि म्यानमारमध्ये विकास कामांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये भारत रस्ते आणि पूल बांधत आहे. यामध्ये जपानलाही सहभागी करून घेतले जाईल.
श्रीलंकेमध्येही एलएनजी टर्मिनल आणि उत्तरेकडे एक बंदर विकसित करण्यात येणार आहे.