वूहान-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. मोदी आणि जिनपिंग हे चीनमधल्या वुहान शहराच्या इस्ट लेक इथं भेटले. दोन्ही नेत्यांनी यावेळी नौकाविहारसुद्धा केला. दोन्ही नेत्यांनी दहशतवादा विरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर कटीबद्धता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून जिनपिंग यांच्या भेटीची छायाचित्रं शेअर करत दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा संदर्भही दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या छायाचित्राबरोबर लिहलयं की, “राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि मी आज सकाळी देखील चर्चा पुढे सुरू ठेवली आहे. वुहानच्या इस्ट लेक परिसरात फिरत असतांनाची ही छायाचित्रं. आम्ही दोन्ही देशांच्या द्वीपक्षीय संबंधांसंर्दभात विविध मुद्द्यांवर चर्चा केली. भारत-चीनची मजबूत मैत्री आमच्या देशवासीयांसाठी आणि संपूर्ण जगासाठी फायद्याची ठरेल असे मोदी म्हणतात. आर्थिक सहकार्याला गती देण्याच्या पद्धतीविषयी तसंच परस्पर संबंधांविषयी चर्चा केली. इतर क्षेत्रांमध्ये कृषी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यटन क्षेत्रावरही चर्चा केली.