पळपुट्या मल्ल्या, मोदीच्या 15 हजार कोटींच्या संपत्तीची जप्ती सुरू!

0

नव्या अध्यादेशानुसार कारवाईसाठी ईडीने कंबर कसली
देश लुटून विदेशात पळणार्‍यांना बसविणार चाप

नवी दिल्ली : आर्थिक घोटाळे करून विदेशात पळून जाणारा मद्यसम्राट विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांवर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई सुरू केली आहे. ईडीने या आरोपींची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरु केली असून, यानुसार, पहिली कारवाई लंडनला पळून गेलेला विजय मल्ल्यावर होत आहे. त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, जतीन मेहता यांच्यावरही संपत्ती जप्तीची कारवाई होणार आहे.

नव्या अध्यादेशाचा ईडीला फायदा
ईडीच्या अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, बँकांचे कर्ज बुडवणारे तसेच विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटले सुरु असणार्‍यांसंदर्भात संबंधित न्यायालयांशी संपर्क साधत या सर्वांविरोधात नव्या अध्यादेशानुसार ईडीला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. आर्थिक घोटाळ्यांतील या आरोपींविरोधात सीबीआय आणि ईडीच्यावतीने आपआपले आरोपपत्र दाखल केल्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे प्रकरण नव्या अध्यादेशानुसार चालवले जाणार आहे.

देशी आणि परदेशी संपत्ती जप्त होणार
ईडीने मल्ल्याप्रकरणात आजवर 9,890 कोटी आणि नीरव मोदी-चोक्सी यांच्या प्रकरणात 7,664 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, नव्या अध्यादेशानुसार, पहिली कारवाई 15,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त होऊ शकते. त्यानंतर इतरही प्रकरणांमध्येही यापुढे अशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे. आता देशातील आणि परदेशातील संपत्तीची जप्ती झाल्याने आरोपींना चाप बसणार आहे.