मोदींनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा मूर्खपणाचा:राहुल गांधी

0

रायबरेली: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. भाजपकडून कॉंग्रेसने सत्तर वर्षात काहीही केले नसल्याचे आरोप केले जात आहे तर कॉंग्रेसकडून भाजप सरकारने या पाच वर्षात काहीही केले नसल्याचे आरोप होत आहे. दरम्यान आज युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचारार्थ रायबरेत घेतलेल्या सभेत राहुल गांधीनी मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभेत मागील ७० वर्षात काहीच झाले नाही, हे सांगत असतात. यावेळी मात्र राहुल गांधी यांनी ७० वर्षांचा मुद्दा घेत मोदींवर टीका केली. मागील ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानाने नोटबंदी सारखा मुर्खपणाचा निर्णय घेतला नसल्याचे आरोप राहुल गांधीनी केला आहे.

२०१४ मध्ये बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपला नोटबंदीचा निर्णय चांगलाच महागात पडण्याची चिन्हे आहेत. विरोधकांकडून नोटबंदीच्या मुद्दावर सत्ताधाऱ्यांवर सतत धारेवर धरले जात आहे. काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी होती, तर मग बँकेच्या रांगेत गरीब शेतकरी का होता, चोर का नव्हते, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या निवडक १५ मित्रांचे खिसे भरल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

देशातील एकही तरुण तुम्हाला म्हणणार नाही, की मोदींनी मला नोकरी दिली. त्याचे कारण म्हणजे देशातील बेरोजगारीने मागील ४५ वर्षांतील उच्चांकी गाठली आहे. ७० वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कुणीही केला नाही. नरेंद्र मोदींनी गरीबांचा पैसा हिसकावला. वाजपेयी यांनी देखील अशा पद्धतीने देश चालवाल नाही, असंही राहुल म्हणाले. दरम्यान देशात सध्या २२ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. मात्र ही पदे भरण्याची इच्छा शक्ती मोदींमध्ये नाही. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस ही पदे भरणार आहे. एका वर्षात ही कामगिरी करून दाखवू असं वचन राहुल यांनी येथील जनतेला दिले.