नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. ‘निशान इजुद्दीन’ असे मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव आहे. प्रसारभारतीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आज ते मालदीवला जातील त्यानंतर उद्या रविवारी ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर असतील. श्रीलंकेत गेल्या महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारत श्रीलंकेसोबत असल्याचे जाहीर करण्यासाठी मोदी हा दौरा करणार आहेत. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी गेल्या आठवड्यात मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘नेबरहूड फर्स्ट’ हे दर्शवण्याचाही मोदींचा प्रयत्न असणार आहे. मोदी मालदीवचे राष्ट्रपती सोलेह यांच्यासोबत मिळून कोस्टल सर्विलन्स रडार सिस्टिमला लॉन्च करतील. या रडार्समुळे हिंदी महासागरात भारतीय नौद निरीक्षणासाठी मदत मिळेल.