कॅन्टोन्मेंट बोर्डासमोर जुन्या वाड्यांचा बिकट प्रश्न; मालक व भाडेकरू यांच्यातील वाद
पुणे : लष्कर परिसरातील जुने वाडे असून यातील अनेक वाडे मोडकळीस आले आहेत. जुन्या वाड्यांपैकी सुमारे 100हून अधिक वाडे हे धोकादायक स्थितीत आहेत. विशेष म्हणजे, अशा वाड्यांमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र, वाड्यांच्या नूतनीकरणाबाबतची किचकट परवानगी प्रक्रिया, मालकी हक्काबाबत साशंकता, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद अशा विविध कारणांमुळे या वाड्यांबाबत कारवाईत अडसर निर्माण होत आहे. परिणामी, या वाड्यांची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून याबाबत नेमके करायचे काय? असा प्रश्न कॅन्टोन्मेंट बोर्डासमोर निर्माण झाला आहे.
लष्कर परिसरातील जुन्या वाड्यांपैकी सुमारे 100हून अधिक वाडे हे धोकादायक स्थितीत आहेत. मूळ मालकाबाबत माहिती नसणे, भाडेकरारातील गोंधळ तसेच नूतनीकरणाबाबतची किचकट परवानगी प्रक्रिया यामुळे या वाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी वाड्यांच्या भिंती मोडकळीस आल्या आहेत. विशेषत: पावसाळ्यात या वाड्यांचा प्रश्न अधिक गंभीर असतो. यामुळे नागरिकांच्या जीवास धोका उदभविण्याची शक्यता असते. त्यामुळे हे वाडे बोर्डाच्या सदस्यांसाठी चिंतेचा विषय आहे.
कायद्यात सकारात्मक बदल
बोर्डाच्या सदस्यांमध्ये लष्करी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या दोन्हींचा सहभाग आहे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार बोर्डाला मिळावा, अशी मागणी बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियंका श्रीगिरी यांनी केली आहे. दरम्यान, नुकत्याच पुणे भेटीवर असलेल्या केंद्रीय समितीसमोरही हा विषय मांडण्यात आला असून, लवकरच कॅन्टोन्मेंट कायद्यात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा बोर्डाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण
काही ठिकाणी थेट रस्त्यावरच पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना दुचाकीस्वारांची तारांबळ होत असून, पार्किंगसाठीही जागा अपुरी पडत असल्याची तक्रार केली जात आहे. एम. जी. रस्त्यावरील सार्वजनिक पदपथावर स्टॉल लावण्याच्या वादातून एकाला मारहाण झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यामुळे बेकायदा अतिक्रमणांवरून कॅन्टोन्मेंटमध्ये दादागिरीचे प्रमाणही वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
नागरिकांची अवस्था बिकट
लष्कर भागातील घोरपडी, वानवडी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जुने वाडे आहेत. या वाड्यांच्या नूतनीकरण, बांधकामाबाबत लष्करी मुख्यालयातर्फे परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेत बराच वेळ जातो. एखाद्या नागरिकाने त्याठिकाणी काही बांधकाम केले, तर त्यांना नोटीस पाठवून पुन्हा ते बांधकाम पाडले जाते, अथवा त्या व्यक्तीस कायदेशीर बाबींच्या चक्रव्युहात अडकावे लागते. यामुळे परिसरातील नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे, असे नगरसेवक विनोद मथुरावाला यांनी सांगितले.
नेतेमंडळींच्या आशीर्वादाने अतिक्रमणे
दरम्यान कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत महात्मा गांधी रस्ता, अरोरा टॉवर्स परिसर, सेंटर स्ट्रीट, छत्रपती शिवाजी मार्केट, फॅशन स्ट्रीट परिसरासह मध्यवर्ती भागातील पदपथांवर मोठ्या प्रमाणातअतिक्रमणे झाली आहेत. पथारीधारकांचे बेकायदेशीर स्टॉल आणि दुकानदारांच्या अतिक्रमणांमुळे पादचार्यांची मोठी गैरसोय होत आहे. स्थानिक नेतेमंडळींच्या आशीर्वादाने ही अतिक्रमणे वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एम. जी. रस्ता, सेंटर स्ट्रीट, शिवाजी मार्केटसह अन्य ठिकाणी कपडे विक्रेते, मोबाइल कव्हर व सीमकार्ड विक्रेत्यांचे स्टॉल, सरबत-फळ विक्रेते, खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांनी व्यापल्याचे आढळून आले.