नवी दिल्ली: ट्विटरने जुलै ते डिसेंबर २०१८ पर्यंत दहशतवादाशी संबधित किंवा दहशतवादाला प्रोत्साहन देणारे १,६६,५१३ अकाऊंट हटवले आहेत. ट्विटरने राबवलेल्या ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी एनफोर्समेंट’ मोहीमेमुळे दहशतवादी संघटनांकडून होणारा ट्विटरचा वापर खूपच कमी झाला आहे. जानेवारी-जून २०१८च्या तुलनेत दहशतवादाशी संबंधित ट्विट १९ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत.
जे ट्विटर अकाऊंट निलंबित केले आहेत, त्यापैकी ९१ टक्के अकाऊंटचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले होते. ८६ देशांतील सरकारांकडून तशा सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातील सर्वाधिक ३० टक्के सूचना अमेरिकेकडून मिळाल्या होत्या. तर अन्य देशांकडून आलेल्या सूचनांचे प्रमाण ३५ टक्के होते, अशी माहिती ट्विटरच्या लीगल, पॉलिसी आणि ट्रस्ट अँड सेफ्टी विभागाच्या अधिकारी विजया गडे यांनी ब्लॉगद्वारे दिली आहे. दरम्यान, दहशतवादाशी संबधित किंवा दहशतवादाला प्रोत्साहन देणारे ट्विट केल्यानंतर संबंधित अकाऊंटवर सूचना प्राप्त होण्यापूर्वीच ट्विटरकडून कारवाई करण्यात येते.