बीड-कौटुंबिक वादातून एका महिले आपल्या पोटच्या दोन मुलींना हौदात बुडवून मारल्याची घटना बीड शहरातील नरसोबा नगर भागात घडली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. दीपा राधेश्याम आमटे (वय २३) असे या निर्दयी मातेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. या घटनेने बीड शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घरातील वाद आणि चारित्र्यावर पती सातत्याने संशय घेत असल्याने तणावत असलेल्या दीपाने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. दीपाचा पती हा रिक्षा चालवतो. सोमवारी घरातील सर्व व्यक्ती बाहेर गेले होते. पतीही रिक्षा घेऊन गेला होता. रात्री घरी आल्यावर राधेश्यामला पत्नी आणि दोन्ही मुली दिसल्या नाहीत. त्यांनी शोध घेतला, पण त्या सापडल्या नाहीत. अखेर त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सकाळी पाणी घेताना हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना याची माहिती समजताच त्यांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून निर्दयी मातेला अटक करण्यात आली आहे.