पुणे – १६ व्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग, संसदेमधील उपस्थिती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर, या अष्टपैलू कामगिरीबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांची चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. चेन्नई येथील आयआयटी व प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘संसदरत्न’ पुरस्कार, प्रथमच निवडून गेलेल्या खासदारांमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेमध्ये केलेल्या कामकाजाबद्दल जाहीर करण्यात आला आहे.
९ रोजी मिळणार पुरस्कार
९ जून २०१८ ला आय. आय. टी. मद्रास (चेन्नई) येथे होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रिय मंत्री अर्जुन राम मेघवाल व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल व पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार एम.के. नारायणन, माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती व डायरेक्टर इन्डीयन इन्स्टीट्युट टेक्नॉलॉजी मद्रास डॉ. भास्कर राममुर्ती यांच्या हस्ते ‘संसदरत्न’ पुरस्कार देवून खा. बारणे यांना गौरविण्यात येणार आहे.
कामगिरीची दखल
खासदाराची संसदेतील कामगिरी, त्यांचा विविध चर्चेमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती यासंदर्भात पी.आर.एस. इंडीयाने दिलेल्या आकडेवारीवरून कामगिरीचा आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरविलेल्या माहितीवरुन याचे मुल्यांकन निवड समिती मार्फत करण्यात येते. त्यानुसार चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने ‘संसदरत्न’ हा पुरस्कार दिला जातो.
९३५ प्रश्न उपस्थित केले
१६ व्या लोकसभेच्या गेल्या ४ वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ९३५ प्रश्न उपस्थित केले. त्यांनी २५५ वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग घेतला, ९५ टक्के उपस्थिती दर्शविली. १६ खाजगी विधेयके मांडले, त्याचबरोबर विविध समितींच्या बैठकीमध्ये सर्वाधिक उपस्थिती आणि स्थानिक खासदार विकास निधीचा सर्वाधिक वापर करून विविध विकासकामे पूर्णत्वास आणली. या कामगिरीबद्दल खासदार बारणे यांची सलग चौथ्या वर्षी या पुरस्कारासाठी निवड झाली असल्याची माहिती बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.