दोन परीक्षा एकाचवेळी आल्याने विध्यार्थांना एक परीक्षेला मुकावे लागणार

0

पुणे :- १३ मे रोजी एमपीएससी व पीडीसीसी बॅंकेच्या (पीडीसीसी) लेखनिक पदासाठी परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवारांना एक परीक्षेला मुकावे लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्षाधिकारी या पदासाठी एक वर्षापासून एकच संयुक्‍त पूर्व परीक्षा घेण्यात येत असल्याने उमेदवारांच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वपूर्ण ठरणार आहे..

पीडीसीसी बॅंकेकडून लेखनिक पदांसाठी ३९३ पदांची भरती करण्यात येत आहे. सुमारे 5 वर्षानंतर बॅंकेच्या लेखनिक पदाची भरती होत असल्याने, उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. नुकतेच अर्ज केलेल्या उमेदवारांना पीडीसीसी बॅंकेने हॉल तिकीट बॅंकेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याचे सूचित केले आहे. त्यावेळी मात्र उमेदवारांनी एमपीएससी व पीडीसीसी बॅंक या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्याचे निदर्शनास आले. पीडीसीसी बॅंकेच्या रिक्‍त पदासाठी ही परीक्षा दि. 11 मार्च रोजी घेण्यात येणार होती. मात्र, ही परीक्षा स्थगित करून पुढे ढकलली. त्यानंतर ही परीक्षा आता दि. 13 मे रोजी घेण्यात येत असल्याने कोणत्याही तरी एका परीक्षेला मुकावे लागणार असल्याची भीती उमेदवारांमध्ये निर्माण होत आहे.